Vikhroli Pink Blossom: विक्रोळीत पुन्हा गुलाबी फुलांचा सडा दिसणार नाही?; 27 फेब्रुवारीला सुनावणी, नेमकं काय घडलं?
Vikhroli Pink Blossom: विक्रोळी ते ठाणे दरम्यानच्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 706 झाडे बाधित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Vikhroli Cherry Blossom: विक्रोळी ते ठाणे दरम्यानच्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 706 झाडे बाधित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील 315 पेक्षा जास्त झाडे तोडली जाणार असून उर्वरित झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरील 'वसंत राणीचा' बहर यंदा अखेरचा ठरणार की काय?, असा सवाल उपस्थित होत आहे. (Vikhroli Pink Blossom)
घाटकोपर-ठाणे उन्नत मार्ग प्रकल्पासाठी विक्रोळीतील प्रसिद्ध 'पिंक ट्रम्पेट' झाडे बाधित होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. झाडांचे सौंदर्य नष्ट होऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमीनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. तर हरित लवादाने, पूर्व मुक्त महामार्गासाठी, पूर्व द्रुतगती महामार्गावरील तब्बल 706 मोठ्या वृक्षांच्या कत्तली संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. (Vikhroli Pink Blossom)
27 फेब्रुवारीला होणार सुनावणी- (Vikhroli Pink Blossom)
दरम्यान या सुनावणीत किती वृक्ष तोडणार, कुठे स्थलांतरित करणार, काही पर्याय उपलब्ध आहे की नाही या बाबत सविस्तर अहवाल मागवला असून 27 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
विक्रोळी पिंक ब्लॉसमची सोशल मीडियावर चर्चा- (Vikhroli Pink Trees)
विक्रोळी, मुंबई येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये फुलणारी गुलाबी रंगाची ‘टॅब्यूबिया’ (Tabebuia Rosea) झाडं प्रसिद्ध आहेत. या झाडांमुळे रस्त्यावर गुलाबी फुलांचा सडा पडतो आणि तो भाग 'जपानमधील चॅरी ब्लॉसम' सारखा दिसतो, ज्याला “विक्रोळी पिंक ब्लॉसम” असेही म्हणतात. ही झाडे आता मुंबईच्या पर्यटनासाठी आणि फोटो काढण्यासाठी एक प्रमुख आकर्षण बनली आहेत. हे दृश्य दरवर्षी हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला पाहायला मिळते, ज्यामुळे विक्रोळीच्या निसर्ग सौंदर्यात भर पडते. गुलाबी रंगाची ही झाडे वसंत ऋतूत फुलतात आणि काही काळासाठी रस्ता गुलाबी छटांनी झाकून टाकतात. या झाडांचे सुंदर दृश्य विक्रोळी (पूर्व) च्या गोदरेज क्रीकसाइड कॉलनी आणि आसपासच्या महामार्गाच्या दुभाजकावर पाहायला मिळते. मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील विकासकामांसाठी (घटकोपर-ठाणे उन्नत मार्ग) यातील अनेक गुलाबी टॅब्यूबिया झाडांवर कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
























