Vijay Mallya : विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टाचं नाव घेतलं, भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही म्हणाला, कोर्टात नवा कांगावा
Vijay Mallya : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्यानं इंग्लंडमधील कोर्टानं देश सोडण्यास मनाई केल्याचा दावा करत भारतात कधी परत येणार हे सांगता येणार नाही, असं म्हटलं.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीत फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची कानउघडणी करण्यात आली होती. त्यावेळी विजय मल्ल्याला शेवटची संधी देत त्यानं भारतात परतणार की नाही स्पष्ट करावे, अन्यथा त्याची याचिका ऐकली जाणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. आज (18 फेब्रुवारी) रोजी झालेल्य सुनावणीत विजय मल्ल्यानं भारतात परतण्यासाठी भारताचा वैध पासपोर्ट नसल्याचं कारण दिलं आहे. इंग्लंडच्या कोर्टानं तिथली सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत देश सोडण्यास मनाई केल्याचा दावा विजय मल्ल्यानं केला आहे.
भारतात परतण्यास न्यायालयीन अडचणी, विजय मल्ल्याचा दावा
आपल्याकडे भारताचा वैध पासपोर्ट नाही तसेच इंग्लंडच्या कोर्टाने तिथली कारवाई पूर्ण होत नाही तोवर इंग्लंड सोडण्यास मनाई केल्याचा दावा विजय मल्ल्यानं केला आहे. इंग्लंडच्या कोर्टाचा दाखला देत भारतात कधी परत येणार ते सांगता येणार नसल्याचा कांगावा मल्ल्यानं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं यानंतर तीन आठवड्यांमध्ये सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मल्ल्याच्या वकिलांना दिले आहेत. याशिवाय केंद्र सरकारला देखील उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मागील सुनावणीत विजय मल्ल्या जोवर भारतात परत येणार नाही तोपर्यंत त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी त्याची याचिका ऐकणार नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. मात्र, इंग्लंडच्या न्यायालयात त्यांची काही प्रकरण प्रलंबित असल्याने जोवर ती निकाली निघत नाहीत तोवर त्यांना यूनाइटेड किंग्डम न सोडण्याचा आदेश तिथल्या न्यायालयाने दिल्याचा युक्तिवाद मल्ल्यानं केला आहे. मल्ल्याच्या वतीने जेष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला आहे.
विजय मल्ल्याने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करणाऱ्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. फरार आर्थिक गुन्हेगार ठरवण्याच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर देखील त्याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाकडून विजय मल्ल्याची कानउघडणी
फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर (FEO) कायद्याच्या तरतुदींना आव्हान देणारी याचिका प्रलंबित असल्याचा फायदा घेत विजय मल्ल्याला देशातील तसेच यूनाइटेड किंगडम मधील न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाकडून मागील सुनावणीत स्पष्ट करण्यात आलं होतं.
विजय मल्ल्याला शेवटची संधी देत मल्याने ते भारतात परतणार की नाही स्पष्ट करावे अन्यथा त्यांची याचिका ऐकली जाणार नाही अस मुंबई उच्च न्यायालयाकडून मागील सुनावणीत स्पष्ट करण्यात आलं होतं.
तुम्हाला परत यावंच लागेल. तुम्ही परत येऊ शकत नसाल, तर आम्ही तुमची याचिका ऐकू शकत नाही, असं स्पष्ट करत तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर पळत आहात, त्यामुळे तुम्हाला या कार्यवाहीचा लाभ घेता येणार नाही अस देखील न्यायालयाने मल्याला बजावलं होतं.
विजय मल्ल्यानं एफइओ कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं आहे. तसेच विशेष न्यायालयाने जानेवारी 2019 मध्ये मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाला देखील मल्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती.
























