मुंबई : वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली आहे. या ठिकाणी सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. एक किलोमीटर परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे चारही जखमी गोडाऊनमध्ये कामाला होते.


सध्या आग आटोक्यात आली असली तरी आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आग लागल्यानं एकामागोमाग एक असे सिलेंडरचे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साधारण 10.30 वाजता ही आग लागली असल्याची माहिती आहे. या परिसरात अनेक सेलिब्रेटी देखील राहत असल्याची माहिती आहे.


आता या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, आगीनंतर स्फोटाचे आवाज भयंकर होते. या आगीत आजूबाजूची काही दुकानं देखील जळून खाक झाली आहेत.


मुंबईत सिलेंडर ब्लास्टच्या 4 दिवसात 2 मोठ्या घटना घडल्या आहेत. पहिली मिरा रोड आणि आज वर्सोवामध्ये. मुंबई आणि इतर मोठ्या शहरात घरगुती सिलेंडरची मोठी गोडाऊन आहेत. त्यातूनच मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा पुरवठा ग्राहकांना होत आहे. मात्र प्रश्न असा उभा राहतोय की ही सिलेंडरची गोडाऊन किती सुरक्षित आहेत?


मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मानखुर्द परिसरात देखील भीषण आग लागली होती. ती आग देखील बराच काळ आटोक्यात आली नव्हती.