पुणे : मराठी माणसे आमच्या पैशावर जगतात असं म्हणणाऱ्या भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी चांगलाच दम दिला. एक्सवर पोस्ट करून वाय झेड करणं बंद करा, नाहीतर आमच्या हातात असलेला बांबू कुठे आणि कधी वापरायचा हे माहिती आहे असं वसंत मोरे म्हणाले. एवढाच माज असेल तर तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योगधंदे करा. आमच्या मराठी माणसाचे उद्योग तुम्ही का घेता? असा प्रश्नही वसंत मोरे यांनी विचारला.
बाहेरच्या राज्यात राहून, एसीत बसून हे असे वादग्रस्त वक्तव्य करतात आणि भोगावं लागतंय ते इथल्या लोकांना, असं वसंत मोरे म्हणाले. एक्स वर पोस्ट करुन वायझेड करणं बंद करा, आणि ते जर येणार असतील मारामारीला, तर आमच्याकडे बांबू आहेत. हे बांबू आम्हाला कुठे आणि कधी वापरायचे माहिती आहेत असा दमही त्यांनी दिला.
असं वक्तव्य म्हणजे लज्जास्पद बाब आहे
आम्ही किती टॅक्स देतो हे निशिकांत दुबेने शिवसेना मनसेला न विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं पाहिजे. ते म्हणतात की महाराष्ट्र नंबर वन आहे. मग तो नंबर वन हा बाहेरच्या लोकांमुळे आहे का? असं वसंत मोरे म्हणाले.
बोलायच्या आधी केडियाला कॉल करा
वसंत मोरे म्हणाले की, "बाहेरुन आलेल्या व्यावसायिकांनी इथे येऊन राजकारण करु नये. एकतर त्यांनी व्यापार करावा किंवा राजकारण करावं. त्यांना राजकारण करायचं असेल तर त्यांनी आधी केडियाला फोन करून विचारावं. निशिकांत दुबे हा भाजपचा खासदार असून त्यांची पिळावळ वाढली आहे. यांना प्रांतवाद करायचा आहे आणि राजकारण करायचं आहे."
तुम्ही महिनाभर दुकाने बंद करा
मीरा भाईंदरमध्ये एक महिला म्हणते की चार-पाच दिवस दुकाने बंद करा. मराठी माणसे उपाशी मरतील. मला या बाहेरच्या सगळ्या लोकांना विनंती करायची आहे. चार पाच दिवस नव्हे तर महिनाभर दुकाने बंद करा. मग पाहुयात कोण उपाशी मरतंय ते? असं आव्हान वसंत मोरे यांनी दिलं. मराठी माणसाला विनंती आहे की ज्यांना ज्यांना भाड्याने दुकाने दिली आहे त्यांना जाब विचारा असंही ते म्हणाले.
यांना ठाकरे ब्रँड काय आहे हे त्यांना माहिती आहे. आतापर्यंत फक्त ट्रिझर दाखवला. जर पिक्चर पाहायचा असेल तर त्यांनी यावं महाराष्ट्रात असं आव्हान वसंत मोरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना दिलं. निशिकांत दुबेने त्याच्या मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना आधी विचारावं आणि मग अशी वक्तव्य करावी असं वसंत मोरे म्हणाले.
काय म्हणाले होते निशिकांत दुबे?
महाराष्ट्राबाहेर या, पटकून मारू अशा शब्दात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या ठाकरे बंधूंना आव्हान दिलं. तसंच हिंमत असेल तर महाराष्ट्रातील मुस्लिम, तामिळ, तेलगू यांना मारून दाखवा अशा शब्दात दुबे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना डिवचलं. तुम्ही कुणाच्या जीवावर जगताय, तुमच्याकडे काय आहे असा सवाल दुबेंनी विचारला. दुबेंच्या या चिथावणीखोर भूमिकेमुळे मोठा राजकीय वाद उफाळणार हे सांगण्याची गरज नाही.
मराठी माणसे आमच्या जीवावर जगतात
मराठी लोक कुणाची भाकर खातात, आमच्याच पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय अशी मुक्ताफळे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उधळली. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत, खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे असल्याची टीका निशिकांत दुबे यांनी केली.