वसई : नववर्षाच्या आगमनालाच मद्यपी कारचालकामुळे 17 वर्षीय दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले. डिव्हाईडर तोडून आलेल्या झायलो कारच्या धडकेत अॅक्टिव्हा चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मद्यपान करुन कार चालवू नका, असं आवाहन वाहतूक पोलिस वारंवार करत असतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

जगभरात नववर्षाचं स्वागत होत असताना रात्री बारा वाजता 17 वर्षांचा मंदार कासेकर मित्रासोबत अॅक्टिव्हाने जात होता. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या झायलो कारचालकाने डिव्हाईडर तोडून त्याला धडक दिली. अपघातात मंदारचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेल्या 22 वर्षीय नंदकिशोर राठोडची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

झायलो कार चालवणाऱ्या विकास वाल्मिकीला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. विकास दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मंदार दोन वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तर त्याची आई गावी राहते. मंदार आपल्या बहिणीकडे नालासोपारात राहत होता. तो नववीत शिकत होता. आईच्या जगण्याची तोच एक आशा होता. मोठा होऊन, चांगलं शिक्षण घेऊन आईला सुखी ठेवण्याची त्याची इच्छा होती. मात्र कुणाच्या तरी मौजेची शिक्षा मंदारला आपल्या जीवाची किंमत देऊन मोजावी लागली.