मुंबई : बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदला पुरा’ अशी मोठी होर्डींग लावण्यात आली. भगिनींचे रक्षण करणारा अशी प्रतिमा यातून दाखवली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा वसई-विरार उपजिल्हाध्यक्षांसह तिघांनी नालासोपारा येथे एका 22 वर्षांच्या तरूणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. या अत्याचाराचीही जबाबदारीही देवेंद्र फडणीसांनी घ्यावी आणि त्यांचाही एन्काऊंटर करून बदलापुरा करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


भाजपा पदाधिकाऱ्यावर कारवाई कधी?


यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नालासोपाऱ्यातील घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत निष्क्रिय व बेजबाबदार मंत्री ठरले आहेत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे पण गृहमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. ‘बदलापुरा’ अशा होर्डींगवर राज्याच्या गृहमंत्री हातात पिस्तुल घेतलेला दाखवला आहे. मग हे पिस्तुल भाजपा पदाधिकारी भगिनींवर अत्याचार करतात तेव्हा कुठे जाते? तेव्हा बदला घेता येत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


बदलापूरमधील इतर आरोपींना शिक्षा कधी? 


बदलापूरच्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांचीच मागणी होती पण या प्रकरणातील इतर आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय पीडित कुटुंबीयांना न्यायही मिळणार नाही. या संपूर्ण प्रकरणात लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बदलापूर शाळेचे विश्वस्त आपटे अजूनही फरार का? त्यांना संरक्षण कोण आणि का देत आहे? त्या व्यक्तीचा भाजपशी थेट संबंध असल्याने त्याच्यावर कारवाई न करण्याचा दबाव पोलिसांवर टाकला जात आहे का? बदलापूर शाळेचे CCTV फुटेज गायब का झाले? याला कोण जबाबदार? कोणाला पाठीशी घातले जात आहे? पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर का केला? त्यावेळेस त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही आणि या क्रूर गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. या गुन्ह्याचा निषेध करणाऱ्या नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


ही बातमी वाचा :