मुंबई: आगामी काळात मुंबई आणि लगतच्या परिसरात अनेक विकास प्रकल्पांचे काम पूर्णत्त्वाला जाण्याची शक्यता आहे. यापैकी एक असलेला बडोदा ते जेएनपीटी महामार्ग (Vadodara Mumbai Expressway) हा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या महामार्गावरील महत्त्वाचा भाग असलेला माथेरान येथील बोगदा (Badlapur Panvel Tunnel) बांधून जवळपास पूर्ण झाला आहे. सध्या या बोगद्याच्या आतील भागात प्लॅस्टरिंगचे काम सुरु आहे. हा बोगदा बदलापूर ते मुंबई आणि बदलापूर ते नवी मुंबई (Mumbai to Badlapur) या मार्गावरील प्रवासाच्यादृष्टीने गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. कारण माथेरान येथील या बोगद्यामुळे बदलापूरवरुन मुंबईला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत प्रचंड मोठी कपात होणार आहे.
सध्या बदलापुरवरून मुंबई किंवा नवी मुंबई गाठायची म्हटले तर लोकल ट्रेनशिवाय पर्याय नाही. मात्र, लोकल ट्रेनचा विलंब आणि गर्दी यामुळे बदलापूर ते मुंबई हा प्रवास अनेकांसाठी नरकयातनांपेक्षा कमी नाही. मात्र, बडोदा ते JNPT या महामार्गावरील माथेरानजवळच्या बोगद्यामुळे बदलापूरकरांना मोठा फायदा होणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर अंतराचा बोगदा हा राज्यातील सर्वात जास्त लांबीचा भुयारी मार्ग ठरणार आहे. हा बोगदा अवघ्या 15 महिन्यांमध्ये तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये करणे शक्य होईल. तर बदलापूर-पनवेल थेट जोडले गेल्याने अटल सेतूमार्गे बदलापूरकरांना जवळपास 40 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होईल.
बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या अत्यंत वेगाने सुरु आहे. या बोगद्यामुळे पनवेल, तळोजा आणि कल्याण या रस्ते मार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. या महामार्गावर बदलापूर ते पनवेल प्रवासासाठी दोन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी दोन्ही बोगदे खोदून पूर्ण झाले आहेत. एक बोगदा जवळपास पूर्ण झाला असून दुसर्या बोगद्याच्या आतील भागात प्लॅस्टरिंगचे काम सुरु आहे. हे काम ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
बदलापूरमधील घरांचे आणि जागांचे भाव वाढण्याची शक्यता
बडोदा ते जेएनपीटी महामार्ग हा अनेक अर्थांनी बदलापूरकरांसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. कारण, या महामार्गामुळे बदलापूरकरांचा प्रवास सुकर होणारच आहे. याशिवाय, हा महामार्ग तयार झाल्यानंतर बदलापूरमध्ये मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात बदलापूरमधील घरं आणि जागांचे भाव मोठ्याप्रमाणावर वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात बदलापूर रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणुकीचा हॉटस्पॉट ठरेल, असा अंदाज आहे.
कसा असेल बडोदा ते जेएनपीटी महामार्ग?
बडोदा ते जेएनपीटी महामार्ग 189 किमी लांब आणि 120 मीटर रूंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.
बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. जानेवारी 2025 पर्यंत बोगद्याचं काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. तर जून 2025 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट आहे. या महामार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या दहिवली गावातून इंटरचेंज असेल. याशिवाय, मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गही या महामार्गाला जोडलेले असतील. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील प्रवाशांना नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगवान आठ पदरी महामार्ग उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा