मुंबई :  मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, त्या अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता आहे कि नाही, याची खातरजमा आता विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. कारण एबीपी माझाच्या हाती अशा अभ्यासक्रमांची यादी आली. ज्यात यूजीसीकडून चार पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यताच देण्यात आलेली नसल्याचं नमुद करण्यात आलं आहे.


'माझा'ला मिळालेल्या यादीनुसार, मास्टर्स ऑफ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट,  मास्टर्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, मास्टर्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट, मास्टर्स ऑफ ह्युमन रिसोर्सस डेव्हलपमेंट मॅनेजमेंट या चार अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यताच नाही आहे.

या संपुर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, दोन महिन्यांपुर्वी याबाबतची तक्रार आमदार मेधा कुलकर्णींनी मुंबई विद्यापीठाकडे केली होती. परंतु याची दखल घ्यायची थोडी देखील तसदी मुंबई विद्यापीठाने घेतलेली नाही.

दरम्यान, सध्या या अभ्यासक्रमासाठी जवळपास 23 महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी आहेत. त्यामुळे या सर्वांवर आता यूजीसीच्या नियमानुसार पदव्या अमान्य होण्याची वेळ आली आहे.