मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा, पण ते आज आमच्यात असते तर आनंद झाला असता. आज ते आमच्यासोबत नाहीत, याची खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते हितचिंतक आणि कुटुंबातील नातेवाईकांना वाढदिवसा निमित्ताने भेटण्यासाठी मातोश्री'वर येऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. असं असताना राज्यातील तसेच देशातील मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना फोनवरुन शुभेच्छाही दिल्या आहेत. या शुभेच्छा देत असताना विरोधकांनी मात्र टीका करण्याची संधी वाढदिवसालाही सोडली नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर टीका केलेली आहे. आज 'सामना' या वर्तमानपत्रात 'सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा', या शीर्षकाखाली अग्रलेख छापण्यात आलेला आहे. या लेखाचा समाचार घेत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होऊ शकत नसल्याचे म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची ताकद पंतप्रधान होण्याएवढी अजिबात नाही. ते पंतप्रधान होणे अशक्य आहे, असं रामदास आठवले म्हणाले.


उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेच आहेत. पंतप्रधान होणे सोपे नाही. त्यासाठी संपूर्ण देशामध्ये पक्ष असला पाहिजे. 18 लोकांवर पंतप्रधान होणे अशक्य आहे, असं आठवले म्हणाले.


सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा : 'सामना'च्या अग्रलेखातून मागणी


रामदास आठवले यांनी मागील पंधरा दिवसांमध्ये शरद पवार यांनी परत एनडीएमध्ये यावं, असं आवाहन केलं होतं. या देशाला आणि राज्याला शरद पवार यांच्यासारख्या मुत्सद्दी आणि हुशार नेत्याची गरज आहे. त्यांनी शिवसेनेला सोडून एनडीएमध्ये यावं असं रामदास आठवले म्हणाले होते. "राष्ट्रवादीच्या हितासाठी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भविष्यासाठी शरद पवार यांनी शिवसेना सोडून मोदींना साथ द्यायला पाहिजे, अनेक वेळा शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असतात. त्यामुळे शरद पवार यांनी अधिक काळ शिवसेनेसोबत न थांबता त्यांनी देशाच्या राजकारणात सक्रिय झाले पाहिजे," असे रामदास आठवले म्हणाले होते.


आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'सामना' प्रकाशित झालेल्या अग्रलेखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भातील वक्तव्य असल्यामुळे रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेलं हे खोचक वक्तव्य आज राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनलं आहे.