मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारण आता तापत चाललं आहे. त्यात सर्वच पक्ष आता पुढील निवडणुकांसाठी तयारी करत आहेत. आता शिवसेनाही तयारीला लागली आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज (9 मे) संध्याकाळी चार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.
का होतेय ही बैठक?
शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील आढावा तसंच आगामी काळात निवडणुकांतील मोर्चेबांधणी, पक्षाचा तळागाळात विस्तार इत्यादी विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीत आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी देखील चर्चेची शक्यता
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यानिमित्त शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आमदार आदित्य ठाकरे किती शिवसैनिक घेऊन जाणार आणि त्याचं आयोजन कसं असेल यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत अयोध्या दौऱ्याच्या तयारीचाही आढावा उद्धव ठाकरे आपल्या आमदारांसह घेणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
शिवसेना आमदार तक्रार करणार
मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले वर्षभर उपचार घेत असल्यामुळे विशेष असे कोणाच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची देखील बैठका घेऊ शकले नव्हते. त्यात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आहे आणि त्यांनी कामाचा सपाटा सुरु केला आहे. त्यात आता उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची बैठक घेणार आहेत. बऱ्याच काळानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधता येणार असल्यामुळे आपल्याला काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे अंतर्गत राजकारण, काम करताना अडथळा, तसंच पक्ष वाढीसाठी येणाऱ्या अडचणी होत असल्याची तक्रार करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, आमदार महाविकास आघाडीतील सहकारी पक्षाच्या आमदारांची तक्रार करणार का, या तक्रारीनंतर शिवसेना नेमकी काय पाऊलं उचलणार हे बैठकीनंतर स्पष्ट होईल.