मुंबई : शिवसेना-भाजप युती 'व्हेंटिलेटर'वर आहे का, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला असता, त्यांनीही 'सिनेमॅटिक' उत्तर दिलं आहे. 'कासव'गतीने युती पूर्वपदावर येत असल्याची मिश्किल टिपणी उद्धव ठाकरेंनी केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मराठी कलाकार उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले होते. व्हेंटिलेटर, कासव यासारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे. हाच योग साधत 'व्हेंटिलेटर'वर असलेली शिवसेना-भाजप युती आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना 'शिवसेना-भाजप युती 'कासव'गतीने पूर्वपदावर येत आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक कलाकार यांचं कौतुक शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या अखेरीस शिवसेना चित्रपट शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येईल.
पाकला कायमचा धडा शिकवा
कुलभूषण जाधव यांच्याबाबत फक्त पत्रव्यवहार करुन काही होणार नाही. पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कठोर कारवाई मागणी केली.