Uddhav Thackeray : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलं आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जंतर-मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तिथे जाऊन उद्धव ठाकरे पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे काही नेते सुद्धा जंतर-मंतर येथे आंदोलन स्थळी जाणार आहेत.

Rahul Gandhi Protest : पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा

दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याचसंदर्भात राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि परीक्षा फुटीवर चर्चेची मागणी केली. मात्र चर्चेआधी सरकारशी बोलावं लागेल असं अध्यक्ष म्हणाल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. त्यावरून राहुल गांधींनी संताप व्यक्त केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायलाच हवा, मात्र विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाचे आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.  

Continues below advertisement

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राम मनोहर लोहिया रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. दिल्लीत संसद भवनावरील मोर्चाच्या वेळी झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस केली. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी देखील राम मनोहर रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यानंतर रूग्णालयातील डॉक्टरांसोबत आपत्कालीन बैठक घेतली.

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर (Delhi Protest Jantar Mantar) मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी जंतरमंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांच्यासह सर्व आंदोलकांना त्याच ठिकाणी अडकवून ठेवले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांचा एक वेगळा जमाव संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. तसेच पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले आहेत.