सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्री अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2016 05:19 AM (IST)
मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने सोमवारी रात्री उशिरा छापा टाकून दोन टीव्ही अभिनेत्री, एक मॉडेल आणि दोन दलालांना अटक करण्यात आली. यामध्ये 'सावधान इंडिया' या शोमधील एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. ज्या ठिकाणी हा छापा टाकण्यात आला, तो परिसर फिल्मसिटीपासून अतिशय जवळ आहे. शिवाय इथे दररोज अनेक टीव्ही कलाकारांची ये-जा सुरु असते. 'दलाल बनून सापळा रचला' मॉडेल, अभिनेत्री आणि दलालांना एका मॉलच्या बाहेर अटक करण्यात आली, अशी माहिती या रॅकेटचा खुलासा करणारे अमित जलाल यांनी दिली. अमित जलाल यांच्या माहितीनुसार, या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर आम्ही दलाल बनून सापळा रचला. याद्वारे आम्ही खरे दलाल सायरा आणि अशरफ उर्फ अमनपर्यंत पोहोचलो. अमन तिथे पोहोचताच आम्ही त्याला अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक 'सावधान इंडिया'मध्ये काम करणारी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि रॅम्प मॉडेल आहे. या सगळ्यांविरोधात दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. मुख्य आरोपी कोण? पोलिसांच्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमागे कबीर नावाचा व्यक्ती आहे. कबीर हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नव्या तरुण-तरुणींना पैशांचं आमिष दाखवून या धंद्यात आणत असेल. कबीरच्या इशाऱ्यावरच अशरफ काम करतो. अशरफ हा कॉलेज विद्यार्थी असून तो शेवटच्या वर्षात शिकत आहे. दलाल सोशल वेबसाईट्सच्या माध्यामातून त्यांचे फोटो पाठवत, असं अमित जलाल यांनी सांगितलं. मुलींना कुठे पाठवत? सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री 50 हजारांपासून 1 लाख रुपये घेत असत. दलाल त्यांना बरेचदा हायप्रोफाईल बिजनेसमन आणि कॉर्पोरेट क्लायंटकडे पाठवत असत.