नवी मुंबई : एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याच्या घरातील पिता, पुत्र आणि नातवाचा एकाच महिन्यात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वडील आणि मुलाचा कोरोनाने बळी घेतला. तर आजोबा वृद्धापकाळाने मृत्यू पावले. घरातील कर्त्या पुरुषांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटवर शोककळा पसरली आहे.


एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यवसाय करणारे हे तिघे पिता, पुत्र आणि नातू नेरूळ येथे राहत होते. 11 मे रोजी आजोबांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. यानंतर वडील आणि मुलगा दोघेही एपीएमसीमधील भाजी मार्केटमध्ये व्यापार करत होते. या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. एकीकडे आजोबांचा मृत्यू झाला असतानाच घरातील दोन करते पुरुष कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याने कुटुंब तणावात होते. उपचार सुरू असतानाच 23 मे रोजी मुलाची कोरोना बरोबर सुरु असलेली झुंज संपली. या दुःखातून संपूर्ण कुटुंब सावरत नाही तोच आज वडीलांचाही कोरोनाने बळी घेतला. एकाच महिन्यात एकाच कुटुंबातील तीन कर्त्या पुरुषांचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


एपीएमसीतील 70 जणांची कोरोनावर मात


कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडल्यानंतर एपीएमसीचे पाचही मार्केट बंद करण्यात आली होती. सर्वाधिक रुग्ण भाजीपाला आणि धान्य मार्केटमध्ये सापडली होती. भाजीपाला मार्केटमधील 70 रुग्णांनी कोरोनावर मात करून पुन्हा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात केली आहे.


नवी मुंबईतील कोरोनाची सद्यस्थिती


नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1996 पार गेला आहे. आतापर्यंत एकूण 63 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज एका दिवसात 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1158 एवढी आहे.

CM Thackeray मुख्यमंत्र्यांची वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र संपादकांसोबत कोणत्या विषयांवर चर्चा झाली?