मुंबई : कर्नाटकात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणू सत्तेवर येण्यासाठी भाजपनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस'वर जलसंवर्धन राज्यमंत्री राम शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.
कर्नाटकात जनतेने जो कौल दिला होता, तो मान्य करणे गरजेचं होतं. जनतेचा कौल मान्य न केल्यास अभद्र किंवा विक्षिप्त घडल्याशिवाय राहत नाही, असं राम शिंदे यांनी म्हटलं. येत्या 2-3 दिवसात कर्नाटकात भाजपची सत्ता येईल असा दावाही राम शिंदेनी केला आहे.
दोन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला
कर्नाटकात दोन आमदारांनी काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला आहे. केपीजेपीचे आमदार आर. शंकर आणि अपक्ष आमदार एच नागेश यांनी पाठिंबा काढला आहे. आज मकरसंक्रांतीच्या दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार कार्यक्षम असलं पाहिजे, असं आमदार आर. शंकर म्हणाले.
तर काँग्रेस-जेडीएस स्थिर सरकार देतील, अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही पक्षांमध्ये तोळमेळ नसल्याने मी काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढत आहे, असं एच. नागेश यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.
कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं. यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदार आहेत. या संख्याबळावर जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
मात्र त्याआधी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. भाजपने 104 आमदारांच्या जोरावर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच येडीयुरप्पा यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली होती.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1