कल्याणच्या पत्री पूल भागात राहणाऱ्या परवीननं 2 दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला. मंगळवारी दुपारी हे बाळ घरात दिसत नसल्यानं शेजाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा बाळाला दवाखान्यात दाखल केल्याचं तिनं त्यांना सांगितलं. पण बाळ दवाखान्यात असेल तर आईला कसं घरी सोडलं? असा सवाल शेजाऱ्यांनी विचारला. त्यानंतर आपण अडचणीत येऊ या भीतीनं महिलेनं मुरबाड रोडवर फेकलेल्या मुलाला पुन्हा घरी आणलं.
यावेळी बाळाचा मृत्यू झाल्याचं शेजाऱ्यांना आढळलं. तेव्हा त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. दरम्यान, बाळाचा मृत्यू झाल्यानं त्याचा अंत्यविधी कसा करायचा? याची माहिती नव्हती. म्हणून बाळाला मुरबाड रोडवर टाकून दिल्याचा दावा परवीननं केला. पण, मुलाच्या अंगावर जखमा आढळल्यानं त्याचा खून झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी बोलण्यास कोळसेवाडी पोलिसांनी नकार दिला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.