मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, विहार तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. मात्र मुंबईकडे पुढील साडेतीन महिन्यांचाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. मागील काही दिवस पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी आणि विहार हे तलाव पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही तलाव ओसंडून वाहण्यासाठी तलावांची एक ते दोन मीटर पातळी वाढण्याची गरज आहे.
मात्र, मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर तलावांच्या तुलनेत तुळशी आणि विहार हे तलाव खूप लहान असून त्यांची पाणी साठवण क्षमतादेखील कमी आहे. तुळशीची पाणीसाठवण क्षमता 139.17 मीटर (8 हजार 86 दशलक्ष लिटर) आहे. रविवारी या तलावाची पातळी 139.07 मीटर होती. म्हणजेच तलाव भरण्यासाठी फक्त 0.10 मीटर भर पडणे आवश्यक आहे. या तलावात रविवारी 7 हजार 903 दशलक्ष लिटर म्हणजेच 98 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. एक दिवस मुसळधार पाऊस झाला तर काही अवधीतच तुळशी तलाव भरून वाहू लागेल.
विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता 80.12 मीटर (17 हजार दशलक्ष लिटर) आहे. रविवारी या तलावाची पातळी 77.96 मीटर होती. आहे. तलाव भरण्यासाठी सुमारे सव्वादोन मीटरपर्यंत पाणीपातळी वाढणे आवश्यक आहे. या तलावात रविवारी 16 हजार दशलक्ष लिटर म्हणजेच 97 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.
या दोन तलावांव्यतिरिक्त अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हे तलाव पूर्ण भरल्यानंतर मुंबईला महापालिकेला विनाकपात पाणीपुरवठा करणे शक्य होते. हे तलाव भरून वाहण्यासाठी चांगल्या प्रमाणातील पावसाची आवश्यकता आहे. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर 31 ऑक्टोबरला सर्व तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. एक ऑक्टोबरला सर्व तलावांत मिळून 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते.
सात तलाव भरण्यासाठी आवश्यक 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणी साठ्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक म्हणजे 7 लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर पाणीसाठा हा एकट्या भातसा तलावांत जमा होतो. त्यामुळे भातसा तलाव 31 ऑक्टोबर रोजी भरलेला असणे खूप महत्त्वाचे आहे.
एकूण पाणीसाठ्याची स्थिती
- 2020 : 3 लाख 91 हजार 290 दशलक्ष लिटर
- 2019 : 7 लाख 43 हजार 531 दशलक्ष लिटर
- 2018 : 11 लाख 10 हजार 323 दशलक्ष लिटर