Tukaram Mundhe Majha Katta : आपल्याकडे दिसायला चांगलं आणि चवदार पदार्थ खाण्यावर भर दिला जातो, पण त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगांमुळे किंवा इतर घटकांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपण चांगलं कसं दिसावं यासाठी मेहनत घेतो, मात्र जे खातो याबद्दल चौकस का राहत नाही? असा प्रश्ना एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विचारला. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं काम एफडीए करत असल्याचं ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत आवडीच्या असलेले पनीर हे शुद्ध की भेसळयुक्त आहे हे कसं ओळखायचं हे सांगितलं.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी एफडीएकडून करण्यात येणाऱ्या कारवाया ते नागरिकांनी खाण्याच्या बाबतीत सजग कसं राहायचं, यावर चर्चा केली.
Pure Vs Adulterated Paneer : शुद्ध पनीर कसं ओळखायचं?
सर्वसामान्यांच्या आवडीचे पनीर हे शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे कसं ओळखायचं याबद्दल तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "एक किलो पनीर बनवायचं असेल तर किमान पाच लिटर दूध लागतं. गायीचं दूध 60 रुपये लिटर जरी पकडलं तरी त्यासाठी 300 रुपयांचं दूध गरजेचं आहे. तसेच इतर गोष्टी जसं की पॅकेजिंग, कामगारांचा पगार असं जर एकत्रित धरलं तर एक किलो पनीर तयार करण्यासाठी 400 ते 500 रुपये लागतात. त्याच्या आत शुद्ध पनीर तयार होऊ शकत नाही."
तुकाराम मुंढे पुढे म्हणाले की, "आपण बाजारात गेल्यानंतर 200 ते 300 रुपये किलो असे पनीर घेतो. त्यावेळी आपल्या मनामध्ये काहीच प्रश्न उपस्थित होत नाहीत. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण स्वस्त पनीर घेतो. पण ते पनीरच आहे की इतर काही आहे हे आपण तपासत नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये तपासणी केली असता 35 टक्के सॅम्पल्समध्ये भेसळ असल्याचं आढळून आलं. त्यासाठी पामतेल किंवा इंडस्ट्रियल ऑईलचा प्रामुख्याने वापर केला जात असल्याचं दिसून आलं. आपण प्रोटिन म्हणून खाणाऱ्या पनीरमध्ये फॅट असतं आणि ते आपल्या आरोग्याला अतिशय धोकादायक असतं."
पनीरमध्ये भेसळीची ही स्थिती राज्यभर किंवा देशभरही आहे. पनीरची हे मुख्यतः दुधापासून बनवलं जातं. पण आपण रोज खातो ते पनीर हे दूध नव्हे तर इतर गोष्टींपासून बनवलं जात आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. यासाठी खाण्याच्या बाबतीत असलेली आपली अनास्था आहे, किंवा आपण त्याबद्दल सजग नाहीत, असंही तुकाराम मुंढे म्हणाले.
FDA Action On Adulterated Food : खाण्यामध्ये रंगाचा वापर धोकादायक
आपण कसं दिसावं यावर आपण मेहनत घेतो. अनेक दुकानात गेल्यानंतर आपण कपडे घेतो. पण आपण जे खातो त्याबद्दल आपण चौकस का राहत नाही, असा मला नेहमी प्रश्न पडतो. न्यूजपेपरमध्ये वडा देतो, समोर असलेले तेल हे काळे असते, असं असलं तरी आपण ते खातो. दिसायला चांगलं आणि चवीला चांगलं अशी आपली आवड आहे. रंगाचा वापर केलेली बिर्याणी आपल्याला आवडते. पण ते आरोग्याला अतिशय घातक आहे, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
तुकाराम मुंढे पुढे म्हणाले की, आपण कोणतीही गोष्ट विकत घेत असताना त्यावरची किंमत आणि एक्सपायरी डेट वाचतो. पण त्या गोष्टीमध्ये कोणते घटक आहेत, हे मात्र पाहत नाही. अनेक वस्तुंवर वरती लिहिलेलं असतं की त्या शुगर फ्री आहेत. पण घटकांमध्ये गुळ असल्याचं लिहितात. मग ही कंपनीकडून होणारी फसवणूक आहे. त्यामुळे आम्ही त्यावर कारवाई करतो.
जर माझ्या आरोग्यावर त्यामुळे परिणाम होत असेल तर ते मी का खायचं? याबद्दल लोकांनी जागरुक राहिलं पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, अशी अपेक्षा मुंढेंनी व्यक्त केली.
FDA Mission : हॉटेलवर कारवाईमागचा उद्देश काय?
एफडीएने सुरू केलेल्या कारवाईमागचा नेमका उद्देश काय असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना मुंढे म्हणाले की, एफडीएने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' हे मिशन सुरू केलं आहे. त्यामागे तीन उद्देश आहेत.
- खाण्याच्या बाबतीत लोकांना जागरुक करणे, अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्त्यव्यांची जाणीव करून देणं.
- जे खरोखरच चांगलं काम करत आहेत त्यांनी कशाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. पण जर तुम्ही जर चुकीचं करत असाल, खाण्यामध्ये भेसळ करत असाल तर तर तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही.
- ही सगळी कारवाई करताना लागू करण्यात आलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे. एफडीएकडे येणाऱ्या तक्रारी आणि एफडीएकडे असलेली माहिती याच्या आधारे ही कारवाई केली जाते.
ही बातमी वाचा:
