ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अर्धवट शिक्षण झालेले तीन डॉक्टर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील बाळकुम येथे ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले ग्लोबल रुग्णालय आहे जे रुग्णालय याआधी दोन वेळा प्रशासनाच्या गाफीलतेसाठी प्रकाश झोतात आले होते. आता थेट प्रशिक्षण नसलेले डॉक्टर या रुग्णालयात आढळल्याने इथे उपचार घेऊन गेलेल्या आणि सध्या उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या जीविताशी प्रशासनाने दगा केल्याची भावना व्यक्त होत आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर, अशा बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.


कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि गरीब रुग्णाना कोविड रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यातील बाळकुम येथील ठाणे पालिकेने जवळपास अकराशे खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय उभे केले. रुग्णांना त्याचा फायदा ही झाला. परंतू आता याच रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर हे बोगस आहेत अशी घटना समोर आलीय.

दोन इंटरशिप पूर्ण न केलेले, तर एक डॉक्टर असे तीघे अजूनही डॉक्टरचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अश्या तीन बोगस डॉक्टरांना पालिका अधिकाऱ्यांनी पकडले असून त्यांच्याबद्दलचा अहवाल तयार करून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. या रुग्णालयात डॉक्टर नेमण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते आणि त्याच्या कडूनच या बोगस डॉक्टरांची भरती करण्यात आलेची सूत्रांची माहिती आहे.

तर प्रकरणी आम्ही चौकशी करतोय, लवकरच नेमका प्रकार काय आहे ते उघड होईल, असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे. तर हा धक्कादायक प्रकार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. यावर कडक करावी झाली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशी अंतर्गत जर हे तिनही डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राषट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केलीय.