मुंबई: मुंबईलाच लागून असलेल्या काशीमिरा इथल्या पूजा को ऑपरेटिव्ह सोसायटीतील टायसन नावाच्या श्वानाचा अचानक संशायस्पद मृत्यू झाला. पोलीसांनी टायसनच्या मृत्यूचा गुन्हा दाखल न केल्याने, सोसायटीतील, रहिवाशांनी श्वानाच्या चौकशीची मागणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या ओरोपींना पकडण्यासाठी सोसायटी आता लढा देत आहे.
काय आहे प्रकरण?
काशीमिरा येथील काशी गांवाजवळ पूजा सोसायटीमधील टायसन नावाचं श्वान २२ ऑगस्टला बेपत्ता झालं होतं. त्यानंतर २३ ऑगस्टला नीलकमल हॉटेलजवळ त्याचा मृतदेह मिळाला. सोसायटीतील रहिवाशांनी टायसनला सोसायटीच्या आवारात दफन केलं. टायसनच्या अचानक गायब होण्याने आणि त्यांच्या आकस्मात मृत्यूने सोसायटीतील रहिवाशांना त्याच्या मृत्यूबाबत शंका आली. कुणीतरी टायसनला मारून टाकल्याचा संशय रहिवाशांना आहे.
टायसनच्या मृत्यूची चौकशी करा
टायसनच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी करत सोसायटीतील रहिवाशांनी काशीमिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही, असा रहिवाशांचा आरोप आहे.
मोदींकडे तक्रार
हताश झालेल्या रहिवाशांनी शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करून, आपली कैफीयत मांडली. या प्रकरणात लक्ष घालून, मुक्या प्राण्याची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.