डोंबिवली: अंड्यामध्ये प्लॅस्टिकसदृश पदार्थ सापडण्याची गेल्या काही दिवसांतली सलग तिसरी घटना डोंबिवलीच्या ग्रामीण भागात समोर आली आहे. डोंबिवलीच्या दावडी गावात राहणाऱ्या नवनाथ लोखंडेंनी प्लास्टिकची अंडी सापडल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनानं या अंड्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.

डोंबिवली आणि कल्याणच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांत अंड्यात प्लॅस्टिकसदृश पदार्थ सापडण्याची तक्रारी वाढल्या आहेत. गोग्रासवाडीत राहणारे अमेय गोखले, दहिसर गावात राहणारे कराटे प्रशिक्षक मदन नायकवडी यांच्यानंतर आता डोंबिवलीच्या दावडी गावात राहणारे नवनाथ लोखंडे यांनाही असाच अनुभव आला.

लोखंडे यांनी रविवारी रात्री त्यांच्या घराजवळच्या दुकानातून काही अंडी विकत आणली होती. ही अंडी फोडल्यानंतर त्यात प्लॅस्टिकसदृश पदार्थ असल्याचं आणि त्याला नेहमीसारखा वास आणि चवही नसल्याचं त्यांना जाणवलं. त्यामुळं त्यांनी मानपाडा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधला.

या घटनेनंतर अन्न आणि औषध विभागाच्या पथकानं दावडी गावात धाव घेत लोखंडे यांच्याकडे असलेली अंडी ताब्यात घेतली. तसंच ज्या दुकानातून त्यांनी ही अंडी खरेदी केली होती, तिथे जाऊनही अंड्यांची तपासणी करण्यात आली. यातून काही नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पुढच्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त सी. डी. राठोड यांनी सांगितलं.

संबंंधित बातम्या:

कोलकाता, चेन्नई पाठोपाठ डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी?