मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. तर महाविकास आघाडी आणि मनसेला मोठा धक्का बसला होता. निवडणुकीनंतर त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न दिलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. आज मुंबईत राज ठाकरेंनी मेळावा घेतला यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला भेटताय मी तुम्हाला भेटतोय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची मी प्रतिक्रिया दिली होती त्याच्यात मी काय बोललो नव्हतो. पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असा नाही. सर्व गोष्टींचा विवेचन सुरू होतं आकलन सुरू होतं. बरीच लोक मला भेटली. गेल्या दोन महिन्यांमध्ये अनेक लोक भेटायला आली. निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, त्या दिवशी मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रात सन्नाटा पसरला होता. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता ज्या प्रकारचा मिरवणुका जल्लोष पाहिजे होता त्या जागी फक्त राज्यभरात सन्नाटा पसरला होता. हे काय झालं कसं झालं असा कसा निर्णय आला, माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी संबंधित होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही.त्यांनी फार छान वाक्य माझ्यासमोर बोलले मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे. काही काही गोष्टींवरती विश्वासच बसू शकत नाही, असा पुढे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राजू पाटलांना त्यांच्या गावात झिरो मतदान
राजू पाटलांचा एक गाव आहे तिथे त्या पाटलांनाच मतदान होतं. साधारण बाराशे ते पंधराशे लोकांचा गाव आहे. त्या चौदाशे लोकांच्या गावांमध्ये राजू पाटलांना किती मत पडले असतील. अख्ख सगळं मतदान राजू पाटला नव्हतं त्यांचे भाऊ उभे होते त्यांना मतदान झालं होतं राजू पाटील उभे होते तेव्हा त्यांना मतदान झालं होतं जेव्हा ते खासदारकीला उभे होते तेव्हा देखील तिथे मतदान झालं मात्र यावेळी त्या गावातून राजू पाटलांना एक पण मत पडलं नाही. अख्या गावातून एकही मतदान पडत नाही जी चौदाशे मतं आहेत ती दरवेळी राजू पाटलांना पाडायची त्या गावात एक मत नाही पडत असं म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या बाबत संशय व्यक्त केला आहे. मराठवाड्याचा एक नगरसेवक आहे. नगरसेवक झाला त्यावेळी त्याला 5500 मतदान त्याच्या भागात झाले होते, आता त्यांना विधानसभा निवडणुकीला 2500 मतदान झालं, अशी माहिती देखील राज ठाकरेंनी दिली आहे. तर विधानसभा निवडणुकीत अनेक असे नेते आहेच. त्यांना विश्वास बसत नाही. निवडून आलेल्यांना बसत नाही. विश्वास बायकोला चिमटा काढ म्हणातात, असं म्हणत त्यांनी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
‘छावा’ या चित्रपटाच्या वादावर राज ठाकरे काय म्हणाले?
‘छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर राज ठाकरे म्हणाले,'छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट काढणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर परवा माझ्याकडे आले होते. ते उत्तम दिग्दर्शक आहेत. मी काही चित्रपटाचा डिस्ट्रिब्युटर नाही. पण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे. कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा आहेत, तर छत्रपती संभाजी महाराज हे आमचे बलिदान आहेत. मी त्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला नव्हता. अमेय खोपकरांनी मला सांगितलं होतं की दिग्दर्शकांना मला भेटायचं आहे. त्यानंतर मी ट्रेलर पाहिला. दुसऱ्या दिवशी ते मला भेटायला आले. अर्थात लेझीम हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझीम घेतलंही असेल, काय माहिती? इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल. मी त्यांना विचारलं की, त्या एका गाण्याने चित्रपट पुढे सरकतोय का? की नुसतं सेलिब्रेशनचं गाणं आहे? त्यावर ते म्हणाले की फक्त सेलिब्रेशनचं गाणं आहे. मग म्हटलं, त्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?', असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
तर, 'आपल्याकडे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय, सगळेच इतिहासतज्ज्ञ झाले आहेत, सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतायत सगळ्याबाबतीत. पण म्हटलं जेव्हा लोक चित्रपट पाहायला जाणार तेव्हा औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत, ते डोक्यात ठेवून जेव्हा लोकं जातील आणि ट्रेलरमध्ये लेझीम वगैरे दिसत असेल तर म्हटलं काढून टाका ते. नंतर मी कोणाशी तरी बोलत होतो की, रिचर्ड ॲटनबरो.. ज्याने महात्मा गांधी चित्रपट केला. आपल्यासमोर महात्मा गांधींची काही आंदोलनं येतात. पण चित्रपट पाहायला गेल्यावर आपल्याला महात्मा गांधी दांडिया खेळताना दिसले, तर कसं वाटलं असतं? दिग्दर्शकांना तो सीन टाकायचाही असेल, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्याने दांडिया खेळता नाही आला. ते जर दोन काठ्या घेऊन चालले असते, तर कदाचित आला असता सीन. माहित नाही आपल्याला,'असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
... तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 7 वेळ आमदार होते. 70 हजारांचा लीड असायचा आणि यंदा 10 हजारांनी पडले. जे निवडून येऊन सत्तेत बसले आहेत. ते ही बोलत आहे. उद्या लोक म्हणतील राज ठाकरे पराभव झाला म्हणून बोलत आहे. अजित पवार पक्षाच्या 42 जागा आल्या आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केले, त्या शरद पवार यांना 10 जागा जिंकता आल्या. लोकसभेला काँग्रेसने सर्वात जास्त खासदार निवडून आणले. शरद पवार साहेबांचे 8 खासदार असून 10 आमदार निवडून आले. ज्या अजित पवार यांचे 1 खासदार आले त्यांचे 42 आमदार कसे निवडून आले. भाजपला 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो, पण अजित पवार 42 जागा ? 4 ते 5 जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना 42 जागा? आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केल त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
तुम्ही तिथे खचून जाऊ नका, तुम्ही ठाम राहा
मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केले ते आपल्याकडे आले नाही. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर न लढवलेल्या बऱ्या आहेत. ही गोष्ट निघून जाईल, कोणी अमर पट्टा घेऊन आले नाही, मला एक गोष्ट सांगायची आहे की, आजपर्यंत ज्या गोष्टी पक्षाने केल्या, आंदोलन केले. आता पर्यंत कोणकोणते विषय घेतले. हे आपल्याला माहिती हवे. भांभावून जाऊ नका. जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार केलेला असतो. तुम्ही तिथे खचून जाऊ नका, तुम्ही ठाम राहा, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
मी कधीही स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही
राज ठाकरे भूमिका बदलतात, असं नेहमी म्हटलं जातं. मी पदाधिकाऱ्यांशी बोललो, भूमिका बदलणं कशाला म्हणतात. हे तुम्हाला माहीत आहे का? राज्यात लोकांनी कशा भूमिका बदलल्या आणि आपण काय केलं हे सांगतो, सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या? आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोकं बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचं सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुमच्या कानात हे ऐकवणार की भूमिका बदलली, भूमिका बदलली, असं म्हणत आत्तापर्यंत नेत्यांनी बदलेल्या भूमिकेवर राज ठाकरेंनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
पक्षात बदलाचे राज ठाकरेंचे संकेत
पक्षात वरपासून खालपर्यंत शिस्त येण्यासाठी एक आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. जे मी वरील पातळीवर बोलेल ते शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील कळायला हवं. पक्षात नेमकं काय सुरू आहे. हे सर्वांना समजायला हवं, असे देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे कदाचित काही पदांची नावे देखील बदलली जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. हे बदल हळूहळू टप्प्या टप्प्याने तुमच्यासमोर हे मांडणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी या मेळाव्यात दिली आहे.
माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम...
लहानपणापासून मी लहान मोठे अनेक पराभव पाहिले आहेत. तसेच अनेक विजय देखील पाहिले आहे. मी पराभवाने कधी खचलो नाही. तर विजयाने हरखून देखील गेलो नाही. विजयाने कधी हुरळून गेलो नाही, खचलेल्या, पिचलेल्या, लोकांचं मला नेतृत्व करायचं नाही. माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम राहा, अशा शब्दत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, जोष आणि नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जे आपल्याला महाराष्ट्रात करायचे आहे, जे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी करायचे आहे, ते आपण करणारच आहोत, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज नाही, उद्या नाही तर परवा करु, मात्र ते होणार म्हणजे होणारच, हे लक्षात ठेवा, असा ठाम विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना सोबत घेतलं, पदं दिली
राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपने आरोप केलेले सर्व जण हे भाजपसोबत आण मंत्रिमंडळात आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आत टाकू, असं मोदी म्हणालेले. मात्र, आम्हाला माहिती नव्हतं की, मोदी त्यांना मंत्रिमंडळात टाकतील. देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, आता ते सोबत दिसतात, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींसह फडणवीसांवर निशाणा साधला आहे.