मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तींवर चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. पोलीस प्रशासनात प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी शोधून काढावा लागतो, असा धक्कादायक दावा निवृत्त पोलीस अधिकारी बोरवणकर यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पोलीस प्रशासनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.


 


राज्यात पोलीस प्रशासनात प्रचंड खाबुगिरी असल्याचा धक्कादायक खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला. पोलीस प्रशासनात प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी शोधून काढावा लागतो, असे त्यांनी सांगितले. अनेक पोलीस स्टेशनमध्ये पैसे जमा होतात. यावेळी त्यांनी स्वतःचा किस्सा सांगितला. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परिस्थिती बिघडत गेल्याचे बोरवणकर म्हणाल्या. लोकांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी प्रश्न विचारायला हवेत. तरच व्यवस्था सुधारेल. पोलीस दलात बदल करायचे असतील तर पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्या यांतला राजकीय हस्तक्षेप थांबायला हवा.


अनिल देशमुखांवरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी, राज्य सरकारचा निर्णय


वाझे यांना एकट्याला हे शक्य नाही.
सचिन वाझे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता मीरा बोरवणकर म्हणाल्या की वाझे यांनी हे एकट्याने केले असेल हे शक्य नाही. त्यांच्या मागे मोठे पाठबळ असणार. क्राईम ब्रँच हे खंडणी वसुली केंद्र झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून याची न्यायालयान चौकशी व्हावी, असे मत मीरा बोरवणकर यांनी मांडले.


पोलिसींग पुर्ण संपलंय : बोरवणकर 
महाराष्ट्र पोलीस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसींग पुर्ण संपले आहे. महाराष्ट्राने केरळ, तेलंगणा या राज्यांकडून शिकावे, असा सल्लाबी बोरवणकर यांनी दिला. सर्व राजकीय पक्षांनी मिळून पोलीस दलाची रया घालवली आहे. पुण्यात असताना दोन एकर लाटण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी माझ्यावर जाहीर आरोप करण्यात आल्याचंही बोरवणकर यांनी सांगितले. पोलीस दलात जात आणि विचारधारेवर आधारीत पोलिस अधिकारी आहेत. ते त्यानुसार वागत असल्याचे त्यांनी सांगितले.