मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये हिंदी कलाकारांसारखीच वागणूक दिली जाते. मात्र, भेदभाव केला जातो तो मानधन देताना. मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांच्या तुलनेत अतिशय कमी मानधन दिले जात असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. उषा नाडकर्णी ह्या माझा कट्टा या कार्यक्रमात आल्या होत्या.
तुसडी, विक्षिप्त, कजाग, कारस्थानी, कपटी, खुनशी, फटकळ, भांडकुदळ, कुचकी, खवचट, खाष्ट, खडूस अशी कितीतरी विशेषणे पडद्यावर तोऱ्यात मिरवणारी अणि मराठीसकट हिंदीतल्या व्हिलन्सची बाप ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आज माझा कट्टा कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली.
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मानधन कमी देतात : नाडकर्णी
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना कायम दुय्यम वागणूक दिल्याची तक्रारी अनेकजण करतात. त्यावर विचारले असता नाडकर्णी म्हणाल्या, की मराठी कलाकारांना वागणूक देताना कोणाताही दुजाभाव केला जात नाही. मात्र, मानधन देण्यात देताना दुजाभाव केला जात असल्याची खंत उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. पुढे त्या म्हणाल्या, की मी कोणालाही घाबरत नाही. मला आतापर्यंत माझ्या कामामुळेचं कामं मिळाली. हुजरेगिरी करुन मी कधीही काम केलं नाही. यामुळे मी 35 वर्ष नोकरी केली. पण, कुणाची हुजरेगिरी केली नाही.
सुशांतसिंग राजपूतचं जे घडलं ते अनेपेक्षित होतं. पवित्रा रिश्ता मालिकेत आम्ही सोबत काम केलंय. तो असं करील असं कधीचं वाटलं नव्हतं. त्याची प्रगती होत असल्याची माहिती मला मिळत होती. मात्रस अचानक झाल्याने धक्का बसला. कोणाला काय वाटतं, यापेक्षा मला काय वाटतं? हे जास्त महत्वाचं आहे.
..अन् आऊ नाव इंडस्ट्रीजमध्ये प्रसिद्ध झालं.
माझा मुलगा माझ्या आईकडे होता. तो मला उषा म्हणायचा आणि आईला आई म्हणायचा. हे आईला आवडायचं नाही. एकदिवशी माझा मुलगा मला आऊ म्हटला. त्यात आईचं आ होता आणि उषा चा उ. त्यामुळे हे नाव मलाही आवडलं. तो एकदा शुटींगला आला असता आऊ म्हणायचा. ते अलकाने ऐकलं आणि ती मला आऊ म्हटली. त्यानंतर समीर.. अन् मग सगळं युनिटचं मला आऊ म्हणायला लागले आणि उषाची आऊ झाली. आता हेच नाव इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालंय.