मुंबई : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, आगामी सण- उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. 'मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली' याप्रकारचे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले असल्याचे विविध समाजमाध्यमांवर काल प्रसारित झालं होतं. 


यावर स्पष्टीकरण देताना महापौरांनी सांगितलं की,  तिसरी लाट ही मुंबईच्या उंबरठ्यावर आली आहे. दोन्ही लाटांचा अनुभव लक्षात घेता, आपण योग्य ती खबरदारी तसेच नियमांचे पालन करून ही लाट थोपविण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. केरळमध्ये मोठ्या संख्येने आढळून येत असलेले रुग्ण तसेच गत काही दिवसांपासून मुंबईमध्ये  रुग्णसंख्या वाढत आहे हे बघता, त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे, असं महापौर म्हणाल्या.


Nitesh Rane Letter to CM : महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात खळबळजनक आरोप


महापौरांनी सांगितलं की,  सुज्ञ मुंबईकर आगामी गणेशोत्सव  लक्षात घेता, "माझे घर,माझा बाप्पा"  यानुसार आपल्या गणपतीचे आपल्या घरीच पूजन करणार. मी गणपतीला इतरांकडे जाणार नाही व कोणाला माझ्याकडे येऊ देणार नाही. तसेच प्रत्येक मंडळाने  "माझे मंडळ, माझा गणपती" याप्रमाणे मी इतर मंडळांमध्ये जाणार नाही व इतरांना माझ्या मंडळामध्ये येऊ देणार नाही, यानुसार आपण वागलो तर गर्दी कमी करण्यात हातभार लावू शकू. सद्यस्थितीमध्ये मास्क वापरणे,वारंवार हात धुणे तसेच सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असून तरच आपण कोरोनावर नियंत्रण मिळू शकतो, असं त्या म्हणाल्या. 


 पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल तरच तिसरी लाट रोखता येईल असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.