ठाणे : ठाण्यातील कळवा-विटावा मार्ग खड्डे दुरूस्तीसाठी चार दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. पण  दुरुस्तीनंतर अवघ्या 24 तासांच्या आत या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक उखडले आहेत.

तीन दिवसांच्या खोळंब्यानंतर रस्ता दुरुस्त झाला आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र दिवस संपत नाही तोच पुन्हा एकदा रस्ता दुरुस्तीसाठी घेतला गेला. पेव्हर ब्लॉक काढून पुन्हा बसवण्याची नामुष्की आज ठाणे महानगरपालिकेवर आली.

२२ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईकरांच्या बराच त्रास सहन करावा लागला होता. पण अवघ्या काही तासांमध्ये येथील रस्ता उखडल्यानं पालिकेचा भोंगळ कारभारही समोर आला.

दरम्यान, याठिकाणी उपस्थित असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या इंजिनिअरशी आम्ही बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र, वारंवार या संपूर्ण प्रकाराबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी हे काम देखील प्रायोगिक तत्वावर केल्याचं सांगितलं. ‘सिमेंटचा रस्ता खड्डेमय झाल्यानं पेव्हर ब्लॉकचे तंत्रज्ञान वापरले. मात्र, ते देखील फेल ठरल्याने आता नवीन कोणते तंत्रज्ञान वापरु शकतो? याचा विचार सध्या सुरु आहे.’ असं ते म्हणाले.

या सर्व प्रकारामुळे ठाणे महापालिकेनं प्रवाशांचा आणि पैशाचा खेळखंडोबाच लावला आहे का? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.

संबंधित बातम्या :

ठाणे-बेलापूर रस्ता 4 दिवस, तर नेरुळ-पनवेल रेल्वे 3 दिवस बंद

ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, कळवा-विटावा रस्ता 4 दिवस बंद