ठाणे : ठाण्यातील सेंटिस पुलावर काल (गुरुवारी, ता २३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट (पुणे) ते वसई जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग (Thane Shivshahi Fire) लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये प्रवाशांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झालं. बसला आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या जवानांकडून (Fire Brigade) आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र, बसच्या खालील बाजूस इंजिन आणि डिझेल टाकीजवळ आग लागल्याने बसने पेट घेतला, त्यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. विशेष म्हणजे या बसमध्ये 15 प्रवासी होते, सुदैवाने प्रवाशांनी बसमधून धाव घेत आपली जीव वाचवला. मात्र, एका प्रवाशाचे साडे तीन तोळेसोनं (Gold) पेटलेल्या बसमध्ये अडकल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता.
सदर शिवशाही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना होत होती, दरम्यान बसला आग लागल्याने प्रवाशांसह सर्वांचाच खोळंबा झाला. या दुर्घटनेत 15 प्रवासी बचावले, पण एका प्रवाशाची बॅग पेटलेल्या बसमध्ये अडकली होती. विशेष म्हणजे, बस जळून खाक झाल्यानतंरही या प्रवाशाचे सोनं वितळता वितळता राहिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले, तर प्रवाशाचा जीव भांड्यात पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित प्रवाशाला त्यांचं सोनं परत केल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त करत अग्निशमन दलाचे आभार मानले. एक महिला प्रवासी पुण्याहून वापीला जात होते, त्या महिला प्रवाशाचे साडेतीन तोळा सोनं बॅगमध्ये अडकले होते, जी बॅग बसमध्ये अडकली होती. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून ते सोनं जशास तसं त्यांना परत मिळालं.
दरम्यान, ही शिवशाही बस ठाण्यात आली, तिथून बोईसरला जाणार होती. मात्र, ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. बंद पडल्यानंतर खालून आग लागल्याचं दिसून आलं. बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते, आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी बसमधून बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सध्या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. तर, बस संपूर्णपणे जळून खाक झाल्यानंतर देखील प्रवाशाचं सोनं जैसे थे राहिल्याने प्रवाशालाही आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.
