ठाणे : शुक्रवारी सकाळपासून पाऊसाची कुठलेही लक्षणे नसताना दुपारच्या सुमारास सुरु झालेल्या मुसळधार पाऊसाने पुन्हा एकदा ठाणेकरांची दाणदाण उडवून दिली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत केवळ 7 मिमी पाऊस पडला होता. मात्र, तोच दीड वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत सात तासात 127 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर संध्याकाळी साडे सहा ते साडे सात या एका तासात ठाण्यात जवळपास तब्बल 30 मिमी पाऊस पडला. रात्रीपर्यंत ठाण्यात आज एका दिवसात अंदाजे 140 मिमी पाऊस झाल्याची शक्यता सांगण्यात येत आहे.
तब्बल तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पाऊसाने शुक्रवारी पुन्हा एकदा दुपारपासून रुद्र स्वरूप धारण करीत मुसळधार पाऊसाने ठाणेकरांना झोडपून काढले. दुपारनंतर तब्बल सात तास मुसळधार पाऊसाने ठाण्याच्या सखल भागात पाऊसाचे पाणी साचले. वंदना सिनेमा, ठाणे पालिका मुख्यालय अश्या मिळून 8 ठिकाणी पाणी साचले होते. सुदैवाने आज मोठी भरती दुपारीच होऊन गेल्याने हे पाणी जास्त काळ थांबले नाही. नाहीतर नागरिकांच्या घरात पाणी शिरले असते. पावसाचा जोर संध्याकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत तसाच होता. ठाण्याच्या कोपरी परिसरातील सुरज बारजवळ असलेल्या लवकुंश सोसायटी येथे पाणी जमले होते. तर घोडबंदर रोडवर प्लॅटिनम हेरिटेज बिल्डिंग, तूरपेपाडा, हिरानंदानी इस्टेट येथे पाणी साचले होते. घोडबंदर रोडवर पुष्पांजली रेसिडेन्सी जवळ वेदांत हॉस्पिटल, ओवळा येथेही पाणी साचले होते. ठाणे पश्चिम येथील जगन्नाथ भागीरथी बिल्डिंग के-व्हिला जवळ, सामंतवाडी ठाणे येथेही पाणी साचले होते.
दुसरीकडे ठाण्याच्या वर्तकनगर भागात मुसळधार पाऊसाने छताचा काही भाग पडला. तर काही भाग हा पडण्याच्या परिस्थितीत आहे. वर्तकनगर हिंदूबाई पवार चाळ, शिवसेना शाखेजवळ, चिरागनगर, पोखरण रोड नं 1 वर्तकनगर ठाणे येथे राहणाऱ्या राजाराम पवार यांच्या घराच्या छताचा भाग कोसळला. तर अन्य भाग हा पडण्याच्या स्थितीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाने दिली. सुरक्षेच्या दृष्टीने तो भागही पाडण्यात येणार आहे. या पडझडीच्या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
ठाण्यात पाच झाडे उन्मळून पडली
तीन ते चार तास सातत्याने पडलेल्या मुसळधार पाऊसाने ठाण्याच्या विविध भागातील झाडे उन्मळून पडण्याच्या पाच घटना ठाण्यात घडल्या असून यात कुठलीही वित्तीय किंवा जीवितहानी झालेली नाही. कोपरी 12 बंगला परिसरातील बंगला क्र 3 हा कलेक्टर यांच्या बंगल्याजवळील दोन झाडेही उन्मळून पडली. तर झाड पडण्याची दुसरी घटना मुंब्रा परिसरात पंचशील अपार्टमेंट नूरानी मस्जिद जवळ, मुंब्रा येथे एक झाड पडले. तिसरी घटना घोडबंदर रोडवरील साईबाबा विहार कॉम्प्लेक्स, आनंदनगर, ठाणे पश्चिम परिसरात एक झाड पडले. चौथी आणि पाचवी घटना ठाण्याच्या श्रीरंग सोसायटीजवळ वृंदावन बसस्टोपजवळ दोन झाडे पडली. जुने मोठी झाडे पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने एक रेस्क्यु वाहनाच्या मदतीने मदतकार्य केले. झाडांच्या पडझडीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.