ठाणे : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची बहरलेली शेती उध्वस्त करून टाकल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. मात्र पाऊस काही थांबण्याच नाव घेत नाही आहे. काल संध्याकाळी शहापूर तालुक्यातील शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा परिसरात वीज कोसळल्याने 26 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर संध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.


शहापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास  विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यासोबत वादळी वारा देखील सुटला होता. सर्व नागरिक आपापल्या घरात एकवटली होती. विजेचा लक्ख प्रकाश खिडकीतून स्पष्टपणे दिसून येत होता. गावातील नागरिक आधीपासूनच घाबरले होते. तेवढ्यात शहापूर तालुक्यातील  शिरोळ ग्रामपंचायत हद्दीतील फणसपाडा येथील थोराड कुटुंबियांच्या घरावर वीज कोसळली. घरातील 8 ते 10 सदस्यांना विजेचा जोरदार झटका बसला. विजेची तीव्रता इतकी मोठी होती की आजूबाजूच्या घरांना देखील विजेचा तडाखा जाणवला. अनेकजणांना विजेचा जोरदार झटका बसल्याने अनेकांचे शरीर सुन्न झाले होते. काही जण बेशुद्ध झाले होते तर काहींच्या हातापायाला मुंग्या जाणवत होत्या. वीजेच्या झटक्याने सर्वजण निपचित पडले होते. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी प्रथम खर्डी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. फणसपाडा  परिसरातील 26 जणांना या विजेचा जबर झटका बसला आहे. ज्यामध्ये महिला-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश आहे.


खर्डी रुग्णालयात 4 तर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात 22 असे एकूण 26 जणांवर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या स्थितीत सुधार होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.  या घटनेची माहिती मिळताच शहापूर विधानसभा मतदार संघाच्या आजीमाजी आमदारांनी तात्काळ धाव घेत खर्डी आणि शहापूर रुग्णालय गाठत जखमींची विचारपूस केली.  तसेच पोलीस उप विभागीय अधिकारी DYSP (श्री नवनाथ ढवळे) सहित शहापूर पोलीसही रुग्णालयात जाऊन जखमींचा जवाब घेतला.


प्रशासनाच्या वतीने शहापुर नायब तहसीलदार डिके वळवी यांनी घटनेचा आढावा घेतला व सतर्कतेचा इशारा म्हणून गावात दवंडी देऊन पाऊस पडत असेल तर बाहेर पडू नये सुरक्षित स्थळी राहावे  अशी सूचना देण्यात आली. तसेच ही सूचना मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना देखील देण्यात आल्याचे नायब तहसीलदार डिके वळवी यांनी सांगितले आहे.