अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर एमआयडीसीमधील एका बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली आहे. एमआयडीसीतील प्लॉट नंबर 40 येथील आर के वन नावाच्या बिस्कीट कंपनीला आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कंपनीला वेढा घातला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले आहे.
अंबरनाथ, बदलापूर अग्निशमन विभागाच्या सात गाड्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त कंपनी बंद असल्याने कंपनीत कर्मचारी नव्हते. त्यामुळे सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंपनीमधील माल जळून खाक झाला असून कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.