Kishori Pednekar: 'ताई तुम्ही खूप छान बोलता' भाजप कार्यालयात ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची क्रेझ! सेल्फीसाठी धावपळ; कार्यालयात एन्ट्री करताच नेमकं घडलं तरी काय?
ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची भाजप कार्यालयातील क्रेझ आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकाने शिंदे गटाच्या कार्यालयात दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली.

Kishori Pednekar: मुंबई महानगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापलेले असतानाच, आज (23 फेब्रुवारी) पालिकेच्या मुख्यालयात वेगळीच आणि अनपेक्षित दृश्ये पाहायला मिळाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांमधील वैयक्तिक आपुलकी आणि सदिच्छा भेटींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची भाजप कार्यालयातील क्रेझ आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकाने शिंदे गटाच्या कार्यालयात दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली.
भाजप कार्यालयात किशोरी ताईंची 'क्रेझ'
ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज चक्क भाजपच्या पालिका कार्यालयाला भेट दिली. भाजप कार्यालयाची अंतर्गत आखणी आणि रचना कशी आहे, याची पाहणी करण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. मात्र, त्या कार्यालयात पोहोचताच तिथल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला.
ताई, तुम्ही खूप छान बोलता, सेल्फीसाठी धावपळ
किशोरी पेडणेकर कार्यालयात आल्याचे पाहून भाजपच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. "ताई, तुम्ही खूप छान बोलता," अशा शब्दांत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पेडणेकरांचे कौतुक केले आणि त्यांच्यासोबत आवर्जून सेल्फी काढले. राजकीय मैदानात एकमेकांवर तुटून पडणारे कार्यकर्ते व्यक्तिगत स्तरावर मात्र आदराने वागताना दिसले.
ठाकरेंचा नगरसेवक थेट शिंदे सेनेच्या दारी
दुसरीकडे, ठाकरे गटाचे अंकित प्रभू यांनी शिंदे गटाच्या (शिवसेना) कार्यालयात जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडत असताना ही भेट झाली. अंकित प्रभू यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात जाऊन भेट घेतली. शिंदे गटाकडून आज दोन स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. यामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सुपुत्राचेही नाव चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर अंकित प्रभू यांनी नवनियुक्त होणाऱ्या उमेदवारांना आणि सुर्वे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
























