मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंसाठी क्वॉरन्टीनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यांची विमानतळावरच आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना थेट घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.


कोरोनाच्या नियमामुळे विमानतळावर चाहत्यांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी फक्त पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केलं. ज्याच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली, त्या अजिंक्य रहाणेच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.


भारतात परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वॉरन्टीनच्या नियमातून वगळण्यात आलं आहे. परंतु प्रत्येक खेळाडूची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली. खेळाडूंच्या आतापर्यंत अनेकदा कोविड टेस्ट झाल्या असून त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांनी ब्रेक जर्नी करतानाही संपूर्ण नियमांचं पालन केलं आहे, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे. सोबतच प्रशासनाने उत्तम सहकार्य केल्याचंही त्यांनी सांगितलं.


मुंबईत परदेशातून आलेल्या प्रवाशांना कोणते नियम?
क्वॉरन्टीन नियमातून खेळाडूंना वगळण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. परंतु कोरोनाव्हायरस आणि कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महिपालिकेने काही नियम लागू केले आहेत.
- परदेशातून विशेषत: आखाती देश किंवा ब्रिटनमधून परतणाऱ्या प्रवाशांना सात ते चौदा दिवसांचा क्वॉरन्टीन पीरियड सक्तीचा आहे.
- विमानतळावरच प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर आरोग्य कर्मचारी बेस्ट बसद्वारे प्रवाशांना हॉटेलपर्यंत घेऊन जातात.
- बीएमसीने ठरवलेल्या निवडक हॉटेलमध्ये प्रवाशांना क्वॉरन्टीन केलं जातं. या हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च प्रवाशांनाच करायचा आहे.
- यानंतर क्वॉरन्टीन पीरियड पूर्ण झाल्यानंतर चाचणी करुन प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळते.