कल्याण : सरकारने नुपूर शर्मा प्रकरणात तात्काळ कारवाई करावी. नुपूर शर्मा यांना पोलिसांनी 22 तारखेपर्यंत जो वेळ दिला आहे तो आम्हाला मान्य नसून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी ऑल इंडिया इमाम कौन्सिलने मुंब्रा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी ऑल इंडिया इमाम कौन्सिलचे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल बासित यांनी आम्ही सामजाला शांततेचं आवाहन केलं आहे. नुपूर शर्मा विरोधात 22 तारखेपर्यंत कालावधी कमी करत तात्काळ ठोस कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी या पत्रकार परिषदेत दिला.


प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. भाजपने त्यांना पक्षातून निलंबितही केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात विविध ठिकाणी 50 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे, मुंब्रा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी समन्स पाठवत शर्मा यांना नोटीस बजावून 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत आज ऑल इंडिया इमाम कौन्सिलने मुंब्रा इथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. 


या पत्रकार परिषदेत ऑल इंडिया इमाम कौन्सिलच्य पदाधिकाऱ्यांनी नूपुर शर्मा यांना अटकेसाठी दिलेल्या वेळेवर आमची हरकत असल्याचं सांगितलं. नूपुर शर्माला 22 किंवा 15 दिवसाचा कालावधी कशासाठी? नूपुर शर्मा यांना तातडीने अटक करण्याच्या सूचना पोलीस कमिशनर किंवा डीआयजी यांनी द्याव्यात. पोलिसांच्या कारवाईवर आम्हाला आक्षेप नसून त्यांना अटकेसाठी दिलेल्या वेळेवर आमची हरकत आहे. कारण या कालावधीत आरोपी पळून जाण्यासाठी किंवा अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यातच अनेकजण सोशल मीडियाद्वारे आरोपीला सपोर्ट करत वातावरण कलुषित करत आहेत. यामुळे देशाचा अपमान होत आहे. फक्त हा आमच्या मातीचा अपमान नाही तर हा देशाचा अपमान आहे. महत्वाच्या पदावर बसलेले जबाबदार व्यक्तीवर यामुळे ताशेरे ओढले जात असल्याने नूपुर शर्मासारख्या व्यक्तींवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. नुपुर शर्मा यांना तातडीने अटक न झाल्यास ऑल इंडिया इमाम कमिटी रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला


अरेबियन देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा अपमान करण्यात आला असून त्यांनी त्यांच्या पद्धतीने भारतात घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे. याआधी देखील अनेकांनी तत्कालीन पंतप्रधान यांचा पुतळा जाळून किंवा त्यांच्या पुतळ्याला चपलेचे हार घालून आपला निषेध व्यक्त केला आहे. आम्ही अशा कोणत्याही मार्गाने निषेध न करता संबंधित आरोपीच्या अटकेची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.


कानपूर येथे घडलेल्या घटनेनंतर कानपूर पोलिसांची कारवाईची भूमिका संशयास्पद आहे. जे व्हिडीओ समोर आले आहेत ते पाहून कोणीही न्यायप्रिय कारवाई चुकीची असल्याचे सांगू शकेल. यामुळेच याबाबत एक कमिटी स्थापन करुन या कमिटीच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल. ही कमिटी न्यायालयाच्या मदतीने सर्व धर्मियांचा समावेश असलेली असावी अशी मागणी मुफ्ती यांनी केली.