मुंबई आयआयटीच्या ‘प्रथम’ची उद्या गरुडझेप?
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2016 09:37 AM (IST)
मुंबई: विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सुरू केलेल्या योजनेतील सातवा उपग्रह सोमवारी अंतराळात झेपावणार आहे. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचे नाव ‘प्रथम’ असून या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणू मोजता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधन विषयात गोडी लागावी यासाठी ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. आता आयआयटी मुंबईत शिकत असलेल्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांनी विकसित केलेला प्रथम हा उपग्रह अंतराळात झेपावणार आहे. या उपग्रहावर आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांनी काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. देशातील 15 विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहात नोंदविलेल्या विद्युत परमाणुंची नोंद होणार आहे. या केंद्रांमध्ये मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.