मुंबई : डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या असून, एसटीच्या प्रवासी भाड्यात (ST Fare Hike) वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती दिली. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांवर तातडीने अतिरिक्त भार टाकला जाणार नसून तात्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Diesel Price Increase : डिझेल दरवाढीमुळे एसटीवर 124 कोटींचा अतिरिक्त भार
मागील आठवड्यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून पुरवठा होणाऱ्या डिझेलचा दर प्रति लिटर 88.21 रुपये होता. आता तो वाढून 91.31 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच प्रति लिटर 3 रुपये 10 पैशांची वाढ झाली आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते.
या वाढीमुळे महामंडळाला दररोज सुमारे 33 लाख 70 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. हा खर्च मासिक स्तरावर सुमारे 10 कोटी रुपये, तर वार्षिक स्तरावर तब्बल 124 कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.
ST Fare Hike Proposal : भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन प्राधिकरणाकडे जाणार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, वाढत्या इंधन खर्चामुळे भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरू शकते. यासाठी इंधन दरवाढीच्या अनुषंगाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या तरी एसटीच्या तिकीट दरात तातडीने वाढ होणार नाही.
MSRTC Loss : एप्रिलमध्ये एसटीला 76 कोटी रुपयांचा तोटा
एसटी महामंडळ सध्या गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. एप्रिल 2026 या महिन्यात महामंडळाला सुमारे 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितलं.
Alternative Measures : ई-बस, इंधन बचत आणि महसूलवाढीवर भर
सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासन विविध पर्यायांचा विचार करत आहे. यामध्ये इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण आणि महसूलवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर दिला जात आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा असून सेवा अबाधित ठेवत आर्थिक संतुलन राखणे हे महामंडळासमोरील मोठं आव्हान असल्याचंही परिवहन मंत्र्यांनी नमूद केले.
ही बातमी वाचा:
