मुंबई: जे.जे. रुग्णालयात एका सफाई कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या इतर सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मृत्यू पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करा अशी मागणी या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


याबाबत बोलताना रुग्णालयात काम करणारे संजय कांबळे म्हणाले की, "मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून जे जे रुग्णालयात बदली कर्मचारी काम करत आहेत. हे कर्मचारी रुग्णालयातील विविध विभागात काम करतात. शासनाने वेळोवेळी या कर्मचाऱ्यांना आम्ही तुम्हांला सेवेत कायम करु अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. परंतु आज अखेर आश्‍वासन पूर्ण झालेलं नाही. काल रात्री उशीरा आमच्यातील अशोक ओव्हाळ या बदली कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याची बायको सध्या कोरोनामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहे. या कर्मचाऱ्याला एक छोटी मुलगी आहे. या कर्मचाऱ्याचा आता कोरनामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे."


बिग बी आणि अक्षय कुमार यांना RPI कडून संरक्षण, रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना इशारा


सफाई कर्मचारी संजय कांबळे पुढे म्हणाले की, "धक्कादायक म्हणजे प्रशासनाकडून याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता या कुटुंबांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आहे? त्यामुळे सरकारने तत्काळ या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. दोन महिन्यापूर्वी पांडुरंग जगताप या आणखी एका सफाई कामगाराचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता. त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना देखील आर्थिक मदत करण्यात यावी. यासोबतच जे जे रुग्णालयमध्ये जे सातशे पैकी 354 कर्मचारी उरले आहेत यांना देखील तत्काळ परमनंट करावं. जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन कायम ठेवणार आहोत."


रुग्णालयातील सफाई कर्मचारी राजू वाघमारे म्हणाले की, "मागील तीस वर्षांपासून जे जे रुग्णालयात आम्ही बदली कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी सेवा करत आहोत. गेली कित्येक वर्ष मी दहा हजार पगारावर काम करतोय. आमच्या पगारात कसल्याही प्रकारची वाढ देखील करण्यात आलेली नाही मुंबईसारख्या शहरांमध्ये इतक्या कमी पगारात काम करणे आणि कुटुंब चालवणे आमच्यासाठी मोठ्याप्रमाणात जिकरीचे होत आहे. आमच्यातील असे अनेक कर्मचारी आहेत जे मुंबईतील उपनगर ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल विरार, वसई यासारख्या भागातून प्रवास करून कामावर येत आहेत. आम्हाला मोठ्या प्रमाणात मेहनत करून देखील त्याबद्दल जो मोबदला आहे तो पुरेसा मिळत नाही. जर पंचवीस-तीस वर्षे सेवा करून देखील आमच्या हातात काहीच मिळणार नसेल तर आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. आमच्यातील काही कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आलेले आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांवर मात्र जाणीवपूर्वक अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे आमची आरोग्यमंत्री अमित देशमुख यांना विनंती आहे की आमच्या मागण्यांकडे तत्काळ लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात."


मुंबईत लोकल सर्वसामन्यांसाठी सुरु केल्याने कोरोना रुग्ण वाढल्याची शक्यता, टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांचं मत