मुंबई : राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घ्यावा. त्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावं. जर त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नाक खुपसलं तर त्यांची शूर्पणखा करू असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी राजनाथसिंह यांना दिला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिह यांनी राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा दावा शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केला आणि आता त्यानंतर एक संतापाची लाट राज्यात पाहिला मिळत आहे.


दरमान्य खासदार अमोल कोल्हे यांनी देखील संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही 1671 च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते”, असे कोल्हे यांनी सांगितले.


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.


आमदार अमोल मिटकरी याबाबत अधिक बोलताना म्हणाले की, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इतिहासाचा अभ्यास शून्य आहे. राजनाथ सिंह यांनी पुण्यात एक चुकीच विधान केले आहे. जिजामाता आणि शहाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांना संस्कार दिले. आणि त्यानंतर 1674 ला शिवाजी महाराज छत्रपती झाले. असा इतिहास असताना पुणे महानगरपालिकेने देखील हा इतिहास मान्य करून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. परंतु, परत राजनाथ सिंह पुण्यात येतात. पुण्याचे काही लोक त्यांना वेगळी माहिती देतात आणि त्यामुळेच त्यांचं बालिश वक्तव्य आलं. राजनाथ सिंह यांना सांगू इच्छितो तुम्ही राफेल खरेदी करायला गेले होतात त्यावेळी त्यांनी लिंबू मिर्ची ठेऊन आकलेचे दिवाळे काढले होते. त्यावेळी पूर्ण जग हसलं होतं. त्यामुळे अशा व्यक्तीने शिवाजी महाराज यांच्याबाबत अभ्यास नसेल तर त्यांनी तो अभ्यास करायला हवा. 


कारण त्यांच्या अवतीभवती जी माणसं आहेत ते तुमचा पक्ष मातीत घालणारी आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण शिवप्रेमी भारतीय जनता पार्टीची कबर खोदायला सुरुवात करणार आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनात दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांचा कुठलाही संबंध येत नाही. दादोजी त्यांच्या पदरी चाकर होते. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची कधीच भेट झाली नाही असे पुरावे आहेत. वीर बाजी पासलकर यांनी त्यांना युद्ध कलेचं प्रशिक्षण दिलं. राजनाथ सिह यांना सांगणे आहे त्यांनी अभ्यास करावा महाराष्ट्रच्या इतिहासात नाक खुपसु नये नाहीतर त्यांची शूर्पणखा झाल्या शिवाय राहणार नाही.