मुंबई: शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे, समर्थक आमदार यांनी बंड केलं आणि शिवसेना फुटली. त्यानंतर अनेक ठाकरेंच्या निष्ठावंतांनी त्यांची साथ सोडली. तर ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या अनेक निष्ठावंत नेत्यांच्या मागे सीबीआय, ईडी लागली. काही नेते जेलमध्ये देखील जाऊन आले, मात्र त्यांनी अद्यापही ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यातील ईडीच्या रडारवर असलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना मोठा आज मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली होती. आज ते जामीनावरती बाहेर येणार आहेत, या बातमीनंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सूरज चव्हाण यांची तुलना लढणाऱ्या वाघाशी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षाला डिवचलं आहे.
आदित्य ठाकरेंची पोस्ट काय?
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाला डिवचलं आहे. "अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज! अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.
वर्षभराच्या कैदेनंतर सूरज चव्हाणांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना अखेर हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. वर्षभराच्या कारावासानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण जेलमधून बाहेर येतील. सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठपुढे सुनावणी झाली होती. ज्यात तथ्य आढळल्यानं हायकोर्टानं सूरज चव्हाण यांना एक लाखाच्या रोख बाँडवर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली असून 17 जानेवारी 2024 रोज अटक केली होती.
काय आहे प्रकरण?
प्रत्येक पॅकेटमध्ये कमी खिचडी भरल्याचे पुरावे जरी नसले तरी कंत्राट मिळवताना पालिकेची फसवणूक केल्याचं स्पष्ट आहे असं निरीक्षण यापूर्वी जामीन फेटाळताना पीएमएलए कोर्टानं नोंदवलं होतं. तसेच आरोपीचा हे कंत्राट मिळवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचंही कोर्टानं मान्य केलं होतं. खिचडी कंत्राटाच्या 3.64 कोटी रूपयांपैकी 1.25 कोटी रूपये सूरज चव्हाणच्या वैयक्तिक खात्यात तर 10 लाख रूपये अन्य कंपनीच्या खात्यात जमा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही ईडीने कोर्टात केला आहे.
खिचडी घोटाळ्याची ईडीकडून चौकशी
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण आणि अमोल किर्तिकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आया प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे असून अमोल कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.
किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.