मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, तरीही शिवसेना महापालिकेच्या शाळेला विरोध करते आहे.


मातीचा ढिगारा, कचरा आणि मैदानात असलेल्या गाड्यांची पार्किंग मानखुर्दमधल्या अयोध्या नगरमधल्या या मैदानाची अवस्था. याच मैदानावर महापालिकेने शाळेला मंजुरी दिली आहे. पण शिवसेना या शाळेला विरोध करते आहे.

भाजपचे माजी नगरसेवक विट्ठल खरटमोल यांनी गेली अनेक वर्ष प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती. त्यानुसार या शाळेच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. 2016 साली महानगरपालिकेने या शाळेच्या प्रस्तावाला करोड रुपये मंजूर देखील झाले. पण अजून एकही वीट रचली गेली नाही.

एकीकडे मुंबई महापालिकेच्या शाळांना एका बाजूला गळती लागलेली असतानाच, दुसरीकडे एम-पूर्व भागात महापालिकेच्या शाळांमध्ये भरघोस पटसंख्या भाग म्हणून पाहिले जाते. पण अयोध्या नगरमध्ये 50 मीटरच्या अंतरावर शाळा असताना मैदानात शाळा कशासाठी? असा सवाल शिवसेनेकडून केला जातो आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हा भूखंड शाळेसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. पण भाजपचे माजी नगरसेवक विठल खरटमोल यांनी आम्हाला अविश्वासत ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप शिवसेना करते आहे.

वाशी नाका येथील अयोध्या नगर येथे महापालिकेची विद्यमान शाळा असून, आणखी एक शालेय इमारत या ठिकाणी बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यमान शाळेची दुरुस्ती करण्यासाठी बाजूच्या मोकळ्या मैदानातील 40 टक्के जागेवर संक्रमण शिबिरासारखी तात्पुरती शाळा बांधली जाणार आहे. उर्वरीत 60 टक्के जागेवर नव्याने शालेय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

विद्यमान शाळेची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतर 40 टक्के मैदानाची जागा खेळण्यासाठी खुली करून दिली जाणार आहे. भाजपाचे माजी नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी या शाळेच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, हे काम हाती घेण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी मोकळ्या मैदानावर शाळा बांधण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. खेळायला मैदानं तर हवी पण त्यासोबत शिक्षणाची साथ तितकीच महत्वाची आहे.