मुंबई : स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून अगदी मंत्र्यांपर्यंत एक वेगळीच ऊर्जा संचारलेली दिसते आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं.


काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक झाली. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या बैठकीकडे होते. कारण शिवसेना आणि भाजपचे मंत्री पहिल्यांदाच आमने-सामने येणार होते. जे अपेक्षित होते, तसेच झाले.

भाजपशी आधीपासूनच ज्यांचं पटत नाही, असे शिवसेनेचे तीन मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भर बैठकीतच एकवटले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विविध मुद्द्यांवरुन मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं.

विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यावरुन सुभाष देसाई आणि रामदास कदम मंत्रिमंडळाच्य बैठकीत संतापले. देसाई आणि कदम यांच्या सुरात सूर मिसळत दिवाकर रावतेंनी धर्मा पाटील यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना घेरलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस झाल्याने, आगामी काळात एकाच सरकारमधील या दोन्ही पक्षांमधील दरी आणखी वाढत जाणार असल्याचे संकेतच आजच्या बैठकीत दिसून आले.