मुंबई : नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात शिवसेनेचं तळ्य़ात मळ्यात सुरू आहे. मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईच्या महापौर बंगल्यावर शिवसेनेची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत उद्या नवी मुंबई पालिकेत तुकाराम मुंढेंविरोधात सादर होणाऱ्या अविश्वास ठरावावर चर्चा झाली.  बैठकीनंतरही यासंदर्भातली शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत आणि विजय चौगुले यांनी शिवसेना मुंढेंविरोधात मतदान करेल असं म्हंटलं आहे. तर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी सावध भूमिका घेत उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील आणि ठरावाच्या वेळी सेना आपली भूमिका जाहीर करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

***********************

मुंबई : नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या महापालिकेतील अविश्वास ठरावासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईच्या महापौर बंगल्यावर सेनेची महत्वाची बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत.

नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंवरुन राजकारणी आणि सर्वसामान्य नागरिक अशी लढाई सुरु झाली आहे. आयुक्तांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे.

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना पक्षाच्या वतीनं व्हीप जारी केलं आहे. केवळ भाजपच्या 6 नगरसेवकांचा अविश्वास प्रस्तावाला विरोध आहे. त्यामुळे उद्याच्या महापालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधातील अविश्वास प्रस्ताव पास होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी 'सेव्ह तुकाराम मुंढे' मोहीम सुरु केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे वादामध्ये कुणाची सरशी होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी आयुक्तांविरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केली असताना, आता या ठरावाला पाठिंबा देण्यावरुनच शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या एका गटाला आयुक्तांविरोधातील अविश्वास ठरावाला शिवसेनेने पाठिंबा देऊ नये यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर दुसरा गट मात्र तुकाराम मुंढेविरोधातील अविश्वास ठरावासाठी आग्रही आहे.

संबंधित बातम्या


'संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे'; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर


तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह


आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव


…तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे


तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला!


नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम


नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई


तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन