Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पुर्नवसनाच्या नावाखाली 300 ते 400 कोटींची वसूली केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
किरीट सोमय्यांचा 300 ते 400 कोटींचा घोटाळा
मागील दोन दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, मुंबई आयआयटी जवळील पेरूबाग येथील पुर्नवसन प्रकल्पात किरीट सोमय्या यांनी 433 बोगस लोकांना प्रकल्पात घुसवले. ही सर्व बोगस लाभार्थी किरीट सोमय्या यांची एजंट होती. प्रत्येकाकडून किमान 25 लाख रुपये सोमय्या यांनी घेतला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या पुर्नवसन प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांना स्थानिक रहिवासी दाखवण्यासाठी बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांचा आधार घेण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या पुर्नवसन प्रकल्पाच्या घोटाळ्यातील कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही या प्रकरणाची कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या नावावर वसुली
सोमय्या यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वसुली केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना या गैरप्रकाराबाबत काही माहिती असण्याची शक्यता कमी असल्याचे राऊत यांनी सांगितले.
...तर तुम्हालाही उघडे करू
किरीट सोमय्या यांची लोक धिंड काढतील असं भाकितही राऊत यांनी वर्तवलं. सोमय्या यांच्या बाजूने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी या प्रकरणात मध्ये पडू नये अथवा तुम्हाला उघडे करू असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
महाआयटी घोटाळ्याचा आरोपी फरारी
भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या महाआयटीच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी अमोल काळे हा देशाबाहेर पळून गेला असल्याची माहिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.