मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात म्हटल्यानं नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली. या वादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांचा देखील जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हटल्याचा व्हिडिओ शेअर केला. जय गुजरातच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात नवं राजकारण सुरु झालं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात एकनाथ शिंदे बोलत होते. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी "जय हिंद, जय महाराष्ट्र,जय गुजरात" असा नारा दिला. एकनाथ शिंदे यांनी हा नारा देताच राज्यातील विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? अशी एक्स पोस्ट केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि मनसे नेत्यांकडून टीका करण्यात आली.
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा देखील जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणत असलेला व्हिडिओ शेअर केला.
उद्धव ठाकरेंचा तो व्हिडिओ नेमका कधीचा?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शेअर करण्यात आलेला उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वीचा आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी रालोआच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. रामविलास पासवान, प्रकाशसिंह बादल यांच्यासह उद्धव ठाकरे देखील त्यावेळी उपस्थित राहिले होते. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जी सभा झाली होती त्या सभेत म्हणजेच गांधीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण संपवताना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना एनडीएमध्ये होती. अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 30 मार्च 2019 रोजी भरला होता. अमित शाह यांच्या फेसबुक पेजवरील 30 मार्चच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये उद्धव ठाकरेंचा जय हिंद,जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलेलं भाषण आढळतं.