मुंबई : स्वपक्षीय नगरसेवकांविरोधात तक्रार करणं शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. घोसाळकर यांना बडतर्फ करण्यावर वरिष्ठ नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


घोसाळकर यांचं पक्षातून निलंबन करावं, या प्रस्तावावर शिवसेनेतील सर्व वरिष्ठ नेत्यांचं एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र अभिषेक घोसाळकर यांचा माफीनामा आल्यास या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल, असंही म्हटलं जातं. अभिषेक यांना माफी मागण्यासाठी उद्यापर्यंत म्हणजे बुधवारपर्यंतची मुदत दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा, नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या तक्रारीमुळे शिवसेनेचेच नगरसेवक शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अभिषेक यांनी तक्रार मागे घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं.

..अन्यथा घोसाळकरांवर कारवाई : शिवसेना


ही तक्रार मागे न घेतल्यास, शिवसेनेकडून अभिषेक घोसाळकरांना नोटीस पाठवण्यात येणार होती. कारवाई करण्यात येईल अशी तंबी पक्षाकडून मिळाल्यानंतर अभिषेक घोसाळकरांना एकाएकी अस्वस्थ वाटू लागलं आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. कायदा तुडवणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं घोसाळकरांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेचा वॉर्ड क्रमांक 1 आणि वॉर्ड क्रमांक 8 मधल्या उमेदवारीवरून हा सगळा राजकीय ड्रामा रंगल्याचं समजतं. घोसाळकर आणि इतर शिवसेना नगरसेवकांमधल्या गटबाजीमुळं, शिवसेनेला दहिसरमधली विधानसभेची जागा गमवावी लागली होती.

या तक्रारीमुळे तिन्ही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या कमी होऊ नये म्हणून पक्षप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.

काय आहे प्रकरण?


दहिसरच्या एलआयसी कॉलनीत एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेतलं आहे. या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यासाठी माजी महापौर, नगरसेविका शुभा राऊळ, शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरण्यात आला.

कर्मयोग उद्यान नावाने हे सर्वश्रुत आहे. या उद्यानाचं 10 जानेवारीला उद्घाटन झालं. मात्र आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजेच 14 जानेवारीला मकरसंक्रांतीचं औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी कर्मयोग उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

घोसाळकरांनी करुन दाखवलं, शिवसेनेच्या तीन नगरसेवकांवर गुन्हा!


या कार्यक्रमाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा या सर्व प्रकाराला आक्षेप होता.  आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलं, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केला होता.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती.

प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, माजी महापौर शुभा राऊळ यांचं पत्र


आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुभा राऊळ यांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली. अधिकार नसताना महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याचं पत्र राऊळ यांनी लिहिलं.

मतदारसंघातील आमची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा दावा शुभा राऊळ यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला. संबंधित अधिकाऱ्यांना आपल्यावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार नसल्याचं राऊळ यांनी पत्रात म्हटलं आहे.