मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार, खासदार, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते असे हळूहळू सगळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले, पण आता शिवसेनाभवनात (Shivsena Bhavan Dadar) काम करणारे लोकही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जात असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाचा डिजिटल मीडियामागचा चेहरा असलेल्या अमोल मटकर यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गट जवळ केला आहे. 


अमोल मटकर हे नाव म्हणजे ठाकरेंच्या डिजिटल मीडियामागचा (Digital Shiv Sena) चेहरा. शिवसेना असेल किंवा युवा सेना असेल, अमोल मटकर याचं डिजिटल मीडियावरचं काम हे ठाकरेंना भुरळ घालायचं. गेली अनेक वर्ष अमोल मटकर हे शिवाई ट्रस्टच्या पगारावर सेनाभवनात काम करायचे. आता याच चेहऱ्यानं उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटाची वाट पकडली आहे.


या आधी एकनाथ शिंदे यांना 40 आमदार आणि 13 खासदारांनी पाठिंबा दिला होता. आता सेनाभवनातले पगारावर काम करणारे कर्मचारीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे जात असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.


अमोल मटकर शिवसेनेचे इव्हेंट्स, सोशल मीडिया आणि डिझायनिंग टीममध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावायचे. दरवर्षीचा दसरा मेळावा, पक्षाचा आणि मार्मिकचा वर्धापन दिन या कार्यक्रमांच्या आयोजनाची आणि मंचावरच्या बॅकड्रॉपपासून संपूर्ण जबाबदारी अमोल मटकर यांच्यावर असायची. पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियावरचे मिम्स, कार्ड्स, फोटोज आणि व्हिडीओच्या डिझाइन्सच्या कामात मोलाची भूमिका असायची. 


Amol Matkar Shivsena: 'होय, करुन दाखवलं!' स्लोगनमागचा चेहरा 


मुंबई महानगरपालिका (BMC Election) 2012 सालच्या निवडणुकीचे गाजलेले स्लोगन 'होय, करून दाखवलं!' या कॅम्पेनमध्ये अमोल यांचा महत्वाचा सहभाग होता. याचबरोबर सेना-भाजप युती सरकारमध्ये परिवहन खात्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात सर्व नव्या शिवशाही एसटी बसेसवरचे (Shivshahi Bus) महाराष्ट्रभरात पोहचलेला लोगोसुद्धा त्यांनीच डिझाईन केला होता. 


यंदाच्या वर्षात स्वातंत्राचा अमृत महोत्सवाचा मराठी लोगोसुद्धा अम्ब्रेला डिझाइन्स यांच्या संकल्पनेतून साकारलेला. ती अमोल मटकर यांचीच कलाकृती. त्यामुळे पक्षातील एक महत्वाचा शिलेदार ठाकरे गटाने गमावल्याची शिवसेनेत चर्चा सुरू आहे. 


अमोल मटकर हे नेहमीच पडद्यामागे राहत असल्यानं त्यांनी कॅमेरावर प्रतिक्रिया दिली नाही. राज्यात आज अनेक मोठमोठ्या कंपन्या डिजिटल मीडियाची काम घेतात. लाखो करोडो रुपये यांच्यावर उधळले जातात. पण त्या तुलनेत अमोल मटकर यांचं काम हे लाखमोलाचं असायचं. त्याची हीच बाब हेरत एकनाथ शिंदेंनी त्यांना आपलंस केलं. 


अमोल मटकर हे एकटेच शिंदेंसोबत गेले नाहीत तर त्यांच्यासोबत अमित शिगवण, अविनाश मालप, प्रथमेश चाचले या कर्मचाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. 


आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केले. पण शिवसेनाभवनात काम करत असलेले कर्मचारीही शिंदेसोबत जात आहेत. एवढी वर्षे ठाकरेंसोबत केलेल्या कामाचा अनुभव या कर्मचाऱ्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे जी रणनीती ठाकरे वापरायचे आता तीच रणनीती शिंदे वापरतील. कारण आता त्यांच्याकडे सेनाभवनातली टीम आहे. जरी शिंदेनी सेनाभवनावर दावा केला नसला तरी शिंदेची भुरळ सेनाभवनातल्या कर्मचाऱ्यांमध्ये दिसते.