मुंबई: मिंधे म्हणतात की नरेंद्र मोदी म्हणजे सूर्य... त्यांच्यावर थूंकू नका, अरे मग तुमचा सूर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? तिकडे का प्रकाश पाडत नाही? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. नरेंद्र मोदींनी जर कोरोनाची लस बनवली असेल तर ते ब्रम्हांडही चालवतील अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. शिवसेनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 


इकडे निष्ठावंतांची गर्दी जमली आहे... तिकडे गारदी जमलेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, पूर्वी पेशवे काळात गोंधळ घालण्यासाठी, वसुली करायला गारदी गोळा केले जायचे. तसेच गारदी आज तिकडे गोळा झाले आहेत असंही ते म्हणाले. 


तुमचा सूर्य मणिपुरात का उगवत नाही? 


उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की. मणिपूर पेटलं असताना आपले पंतप्रधान अमेरिकेत चालले आहेत. हे बोलल्यानंतर नवगुलाम बोलले, सूर्यावरती थूंकू नका. मग ते जर सूर्य असतील तर मणिपूरमध्ये प्रकाश का पाडत नाही? मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही. एका रिटायर्ड अधिकाऱ्याने सांगितलं की मणिपूरमध्ये लिबियासारखी परिस्थिती झाली आहे. त्या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळलं जात असताना भाजपचे नेते तिकडे जात नाहीत. 


देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला... 


उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीवर टीका करताना म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातील हास्यजत्रेचा प्रयोग केला. कोविडची लस मोदीजींनी तयार केली... असं ते म्हणाले. मग बाकीच्या कंपन्या काय गवत उपटत बसल्या होत्या का? त्यांच्या हास्यजत्रेत अवली सगळीच आहेत, लव्हली कुणीच नाही... याला जनता कावली आहे. मोदी हे विश्वगुरूंचे विश्वगुरू... लस त्यांनी बनवली असली तर नक्कीच ब्रम्हांडही चालवतील. 


हिंमत असेल तर देशांचे शत्रू संपवा.... राजकारणातले शत्रू कशाला संपवताय? असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


ज्याला जायचं तर त्याने जावं...


उद्धव ठाकरे म्हणाले की, जे भाडोत्री किंवा बिकाऊ असतील त्यांना घेऊन जायचं तर जा. कारण रोज फोन चालू आहेत...काय करता या ना. चांगलं स्वाभिमानाचं, जिद्दीचं, निष्ठेचं हे शिवसेनाप्रमुखांनी दिलेलं बियाणं आहे. हा उद्धव ठाकरे एकटा नाही तर समोर बसलेले सगळे उद्धव ठाकरे आहेत. पीक कापून नेलंय मात्र शेती आमच्याकडे आहे.