Shivsena Dasara Melava Row : दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2023) शिवाजी पार्क (Shivaji Park) कुणाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रालाच होती. अशातच दोन्ही गट शिवाजी पार्कसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत होतं. पण या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तशी माहितीच शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. तसेच, शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल मैदानावर होणार असला तरी, ठाकरेंना मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशातच आता ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत कोणतात निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत जरी दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं असलं तरी, ठाकरेंना शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मात्र शिवसेनेच्या शिंदे गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला मिळणार? हा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत.


दीपक केसरकर काय म्हणाले? 


मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. तसेच, आम्ही सहानुभूतीचे राजकारण करत नाही. विकासाचं राजकारण करतो. त्यामुळेच वादात न जाता शिवाजी पार्कऐवजी दुसरं मैदान आम्ही घेतलेलं आहे. ठाकरे गट स्वत:च राजकारण करतो आणि स्वत:च प्रसिद्धी मिळवतो, हे आता जनतेनं ओळखावं, असा टोलाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


पालिकेचा निर्णय काय? 


दीपक केसरकरांनी शिंदे गटानं दसरा मेळाव्याचं ठिकाण बदललं असल्याची माहिती दिली. मात्र, अद्याप शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पालिकेला यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवाजी पार्क कोणत्या शिवसेनेला द्यायचं? याबाबत अजुनही पालिका प्रशासन संभ्रमात आहे. याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनानं घेतली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सोमवारी विभाग अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं त्यांना सांगण्यात आलं. याच मुद्द्यावर आज, मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेणार आहेत.


शिवसेनाएकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केले होते. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनानं तत्काळ निर्णय घेण्याचं टाळलं. पहिला अर्ज कोणाचा आला त्याबाबत दोन्ही गटांनी गुप्तता पाळली आहे.