Shiv Sena Saamana On Center : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) आजपासून सुरु होत आहे. राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेचं कौतुक आजच्या सामना (Saamana) च्या अग्रलेखातून करत शिवसेनेनं भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, राहुल गांधी एका जिद्दीने भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघाले. भाजपने त्यावर टीका सुरू करून राहुल यांच्या 'भारत जोडो' यात्रेच्या यशाचा नारळच वाढवला. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेने भाजपास कामास लावले आहे, त्यांना 'भारत जोडो' चे भय वाटत आहे, हेच वास्तव आहे, राजकीय मतभेद दूर ठेवून 'भारत जोडो' कडे पाहायला हवे, असं सामनामध्ये (Saamana Articule) म्हटलं आहे. 


भाजपला आजही काँग्रेसचे भय वाटते


सामनामध्ये म्हटलं आहे की, काँग्रेस पक्षाने 'भारत जोडो' यात्रेची घोषणा करताच भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रवक्ते टीका करू लागले. याचा सरळ अर्थ असा की, भाजपला आजही काँग्रेसचे भय वाटते. तसे नसते तर हताश, निराश आणि कमजोर झालेल्या काँग्रेस यात्रेची दखल घेण्याची गरज नव्हती. देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाला तरी हे शोभा देत नाही. काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने राष्ट्रीय ऐक्यासंदर्भात एखादा कार्यक्रम ठरवला असेल तर त्यास कोणी अपशकून करू नये. असे कार्यक्रम सध्या राष्ट्रीय ऐक्यासाठी हवेच आहेत. जर परराष्ट्रांतील ट्रम्प वगैरे लोकांसाठी आपल्या देशात निवडणूक प्रचाराचे कार्यक्रम होत असतील व त्या कार्यक्रमात आपले पंतप्रधान आणि त्यांचा राजकीय पक्ष घरचे कार्य असल्याप्रमाणे राबत असतील तर मग काँग्रेसच्या राष्ट्रीय यात्रांवर टीका करण्याचे कारण नाही. 


स्वातंत्र्य लढ्याचा महान वारसा काँग्रेस पक्षाला लाभला


दिल्लीत अशा प्रकारचे आंदोलन करण्याचे नैतिक बळ काँग्रेस पक्षात आहे. कारण पक्ष शरपंजरी असला तरी देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष तोच आहे. स्वातंत्र्य लढ्याचा महान वारसा या पक्षाला लाभला आहे. भारतीय जनता पक्षाकडे असा कोणता वारसा असेल तर सांगावे. काँग्रेसने 70 वर्षांत काय केले वगैरे प्रश्न विचारणाऱ्यांनी आपल्या जन्मतारखा एकदा तपासायला हव्यात. आमचे काँग्रेसबरोबर मतभेद आहेत व राहतील. काँग्रेसच्या फाजील सेक्युलरवादावर आमच्या इतके प्रहार कोणीच केले नाहीत, पण काश्मीरातील फुटीरतावादी मेहबुबा मुफ्तींच्या पक्षापेक्षा काँग्रेस बरी असे भाजपला वाटत नाही काय? भाजपचे आजचे बाळसे ही नवहिंदुत्वाची सूज आहे. सर्व प्रश्नांवर 'हिंदू विरुद्ध मुसलमान' हाच उपाय त्यांच्याकडे आहे आणि लोक त्यास फशी पडत आहेत. पुन्हा पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून मतांचे ध्रुवीकरणदेखील नेहमीचेच आहे. मात्र आपली हजारो हेक्टर जमीन घशात घालणाऱ्या, सतत घुसखोरी आणि सीमेवर कुरबुरी करणाऱ्या चीनच्या विरोधात कधी पाकिस्तानप्रमाणे ललकारी देताना भाजपवाले दिसत नाहीत. 


सध्या यात्रांचे दिवस सुरू


राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा फलदायी ठरेल हे पाहायला हवे. मदत करता येत नसेल तर निदान अपशकुनी मांजरासारखे आडवे तरी जाऊ नये. काँग्रेस पक्ष अंतर्गत भांडणाने जर्जर झाला आहे हे खरेच आहे. तरीही राहुल गांधी एका जिद्दीने भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघाले. भाजपने त्यावर टीका सुरू करून राहुल यांच्या 'भारत जोडो' यात्रेच्या यशाचा नारळच वाढवला. श्री. आडवाणी यांनीही रथयात्रा काढली व त्याची फळे आजचा भाजप चाखत आहे. राजीव गांधी, चंद्रशेखर यांनी यात्रा काढल्या. आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी आणि त्यांचे चिरंजीव आणि सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही पदयात्रा काढली. अखिलेश यादवांनीही एकेकाळी उत्तर प्रदेशात सायकल यात्रा काढून जनमत जिंकले होते. आता महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंच्या 'निष्ठा यात्रे' ला उदंड प्रतिसाद लाभला. उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रेस निघणार आहेत. सध्या यात्रांचे दिवस सुरू झाले आहेत. मात्र राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेने भाजपास कामास लावले आहे, त्यांना 'भारत जोडो' चे भय वाटत आहे, हेच वास्तव आहे. राजकीय मतभेद दूर ठेवून 'भारत जोडो' कडे पाहायला हवे, असं लेखात म्हटलं आहे.