Anil Parab : राज्यात शिवसेनेच्या गोटात अंतर्गत बंडाळी उफाळून आली असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेले परिवहन मंत्री अनिल परब  दापोली रिसाॅर्ट प्रकरणी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. काल ईडीकडून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. 


अनिल परब दापोलीमधील रिसाॅर्ट प्रकरणात झालेल्या कथित मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने अनिल परब यांना मागील आठवड्यात चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी अनिल परब यांनी मंत्री असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते.


काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान, अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनिल परब हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.  


हे सगळे बारकावे समजून घेतले पाहिजेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल 


अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आज हे सर्व होत असतानाच अनिल परब यांना नोटीस आली, हे सगळे बारकावे समजून घेतले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 


शिवसेनेला ठरवून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न ?


मुंबई मनपामध्ये सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला आहे. शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनिल परब हे मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेचे महत्त्वाचे रणनीतिकार समजले जातात. मुंबईतील वॉर्डमधील समीकरण अनिल परबांना चांगल्याच प्रकारे ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात धाडल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या