मुंबई : महाराष्ट्राला काका-पुतण्याचा किंवा भावा-भावांचं भांडणं नवं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून असाच एक वाद समोर आला आहे, तो म्हणजे तटकरे बंधूंचा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधानपरिषद आमदार अनिल तटकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कटुता निर्माण झाली आहे. मात्र, आता हा वाद मिटवण्यासाठी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यातील कटुता कमी करण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी करण्याचं ठरवलं आणि काल शरद पवारांनी स्वत: फोन करुन तटकरे बंधूंना तातडीने बारामतीला बोलावून घेतलं.
नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल तटकरे यांचे धाकटे पुत्र संदीप तटकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून रोहा नगरपालिकेत उतरले. त्यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि अनिल तटकरे यांचे थोरले पुत्र अवधूत तटकरे यांनी शिवसेनेकडून लढणाऱ्या संदीप तटकरेंच्या प्रचाराला उपस्थिती लावली.
संदीप तटकरेंचं शिवसेनेकडून लढणं, हा तटकरे कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. मात्र, निवडणूक चुरशीची होऊन रोहा नगरपालिकेत काकांचीच म्हणजे सुनील तटकरेंचाच विजय झाला. मात्र, काका-पुतण्या आणि भाऊ-भाऊ हा वाद कायम राहिला.
काही दिवसांवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा पवित्रा म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मध्यस्थी करुन यातून मार्ग काढणार आहेत.